World Meditation Day : जागतिक ध्यानदिनी गंजगोलाईचा इतिहास विश्वमय होणार
लातूर : संयुक्त राष्ट्राने 21 डिसेंबर हा ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर लातूरच्या गंजगोलाई परिसरात भव्य सामुदायिक ध्यान उपक्रम राबविला जात आहे. रविवार, 21 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता गंजगोलाई परिसरात भव्य सामुदायिक ध्यान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे गंजगोलाईचा इतिहास, संस्कृती आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचणार असून या उपक्रमात लातूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा आवाहन करण्यात आले आहे.
गंजगोलाईच्या मध्यभागी एकत्र येणाऱ्या 16 रस्त्यांवरून विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे या 16 विविध रस्त्यावर ध्यानासाठी बसणाऱ्यांची जबाबदारी 16 विविध संघटनांनी घेतलेली आहे.
इतिहास, संस्कृती आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे संपूर्ण परिसर ध्यानमय होणार आहे. यामुळे मानवी मनाला शांतीचा मार्ग दाखविणाऱ्या ध्यानसाधनेच्या माध्यमातून लातूरची नवी ओळख जगासमोर मांडली जात आहे. या ध्यान साधनेतून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, सामाजिक ऐक्य, तणावमुक्त जीवन, अहिंसामुक्त परिसर याच्यासाठी ह्या ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मोठ्या संख्येने प्रत्येक लातूरकराने सामुदायिक ध्यान उपक्रमात हजेरी लावून ऐतिहासिक गंजगोलाईचा जागतिक नावलौकिक वाढवू,असे आवाहन आपण लातूरकरच्या वतीने करण्यात आले आहे.
गंजगोलाई ही केवळ बाजारपेठ नसून, शहर रचनेचा एक अद्वितीय नमुना आहे. शंभर वर्षांपूर्वी स्थानिक व्यापाऱ्यांच्या दूरदृष्टीतून साकारलेली ही गोलाकार बाजारपेठ आज जागतिक ध्यान दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या उपक्रमामुळे ध्यान साधनेचा अनोखा ‘लातूर पॅटर्न’ निर्माण होत असून, लातूरकरांची एकजूट आणि सांस्कृतिक वारसाही अधोरेखित होणार आहे.

