धाराशिव : बायपास रोडलगतच्या शिवनेरी नगरात अंतर्गत गटारी तुंबल्या आहेत. नव्याने झालेल्या बायपासच्या नाल्याला या गटारी न जोडल्याने ही समस्या उद्भवली आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास मोठी समस्या उद्भवणार आहे.  (छाया : भीमाशंकर वाघमारे)
धाराशिव

Dharashiv civic issues : शिवनेरी नगरात मूलभूत सुविधांचा बोजवारा

धाराशिव: सर्व्हिस रोडच्या नालीला जोडणी नसल्याने संकट

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : शहराच्या बायपास रोडलगतच्या परिसरात स्वच्छता तसेच सुविधा पुरविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. नागरी सुविधा मिळत नसल्याने या भागातील नागरिकांचे हाल होत आहेत.

सांजाचौक ते पुढे वरुडा चौकादरम्यानच्या बहुतांश भागात असेच चित्र आहे. विशेषतः शिवनेरी नगर भागात दोन महिन्यांतून एकदाच नालेसफाई केली जाते. तीही विशिष्ट ठिकाणीच होते. परिणामी नाले तुंबल्याने दुर्गंधीचे प्रकार वाढले आहेत. शिवनेरी नगरातील श्री साई हॉटेलच्या पिछाडीस असलेल्या भागात अंतर्गत गटारी नव्याने झालेल्या बायपास रोडच्या नालीला न जोडल्याने पाणी तुंबून राहत आहे.

सर्व्हिस रोड होऊन वर्ष झाले तरी पालिकेने अजूनही याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या भागात अनेक घरांत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी सातत्याने मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याशिवाय या भागातील पथदिवेही सातत्याने बंद असतात. अपवाद वगळता पथदिव्यांचा लपंडाव सुरू असल्याने चोरीचे प्रकार वाढले आहेत.

12 तास वीजपुरवठा बंद

या भागातील वीजपुरवठ्याबाबतही महावितरण गंभीर नसल्याचे दिसत आहे. शनिवारी मध्यरात्री 12 वाजता वीजपुरवठा बंद झाला तो रविवारी दुपारी दोन वाजता सुरळीत झाला. या काळात घामाच्या धारांत नागरिकांना पूर्ण रात्र व दिवस काढावा लागला. मागील दोन वर्षांपासून या भागातील वीजवाहिन्या लोंबकळत आहेत. त्या एकमेकांना घासत असल्याने शॉर्टसर्किट होऊन सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. याकडे महावितरणचे अधिकारी तसेच राजकीय नेते, लोकप्रतिनिधी गांभीर्याने पाहत नसल्याने ही समस्या अद्याप सुटलेली नाही.

पाणीपुरवठाही विस्कळीत

या भागातील पाणीपुरवठाही दोन महिन्यांपासून अनियमित झाला आहे. चार ते पाच दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता आठ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. टँकरचे महागडे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT