

सोलापूर : सोलापूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून एमआयडीसी भागाला हप्ते घेऊन जादा पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. एमआयडीसीकडून अधिकाऱ्यांना हप्ते दिले जातात. याप्रकरणी स्टिंग ऑपरेशन करण्याचा इशाराही त्यांनी सभागृहात दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 20) महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभा सुरू होताच शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे, चेतन नरोटे यांनी सभागृहात चुकीचे वंदे मातरम् लावल्याबद्दल आणि मागील सभेचे इतिवृत्त मान्य नसल्याचा मुद्दा उपस्थित केला व प्रशासनास धारेवर धरले. नगरसेवक अनंत जाधव शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा विषय लक्षवेधीच्या माध्यमातून दाखल केला. सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांना लक्ष्य करत नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेबाबत जाब विचारला. शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोप करत, कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
काही भागांत तीन दिवसाआड पाणीपुरवठा केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो; मात्र प्रत्यक्षात चार ते पाच दिवसांनी पाणी येते. हद्दवाढ भागात सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरसेवक अनंत जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला. शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे, चेतन नरोटे तसेच सत्ताधारी भाजपच्या अनेक नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तळवळकर यांनीही प्रशासनाला अनेक प्रश्न विचारत पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी केली. विशेषतः सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार झाला. अनेक नगरसेवकांनी आपल्या-आपल्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचत पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. काही भागांत मध्यरात्री पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. या मुद्द्यावर जवळपास दीड तास चर्चा झाली. मात्र ठोस निर्णय निघाला नाही.
आयुक्तांच्या उत्तराने झाले नाही समाधान
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत स्कॅडा प्रणालीवर 51 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या प्रणालीचा वापर देखील व्यवस्थित होत नसल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे आणि काँग्रेसचे गट नेते चेतन नरोटे यांनी केला. यावर प्रशासन प्रमुख महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे अमोल शिंदे चांगले आक्रमक झाल्याचे दिसून आले.
कोण काय म्हणाले...
- भवानी पेठ परिसरातील नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा : राजकुमार पाटील
- विडी घरकुल भागात रात्री पाणी पुरवठा : युवराज सरवदे
- रमजान दिवशी तरी पाणी पुरवठा सुरळीत करा : आसिफ शेख
- शेळगी, दहिटणे भागात पाण्याच्या टाक्या बंद : डॉ. किरण देशमुख
- पाण्याची मोठ्या नासाडीला आळा घाला : मनिष केत
- एमआयडीसी भागात पाच पाण्याच्या टाक्या बंद : व्यंकटेश कोंडी
- प्रभाग पाचमध्ये अनेक नगरात पाणी समस्या, अधिकारी लक्ष देत नाहीत : बिजु प्रधाने
- शेळगी भागात रात्री पाणी पुरवठा केला जातो. : प्रथमेश कोठे