Dharashiv Agriculture News : कमी पाऊस; उगवण न झालेली बियाणे अन् गोगलगायींचा हल्ला file photo
धाराशिव

Dharashiv Agriculture News : कमी पाऊस; उगवण न झालेली बियाणे अन् गोगलगायींचा हल्ला

सोयाबीन उत्पादक शेतकरी तिहेरी संकटात

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv Agriculture News: Scanty rainfall, seeds failing to germinate, and a snail infestation

ईट, पुढारी वृत्तसेवा : ईटसह परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी यंदा तिहेरी संकटाचा सामना करत आहेत. आधीच कमी पावसामुळे पेरणी उशिरा झाली असताना अनेक शेतकऱ्यांनी नामांकित कंपन्यांचे तसेच शासन व कृषी विभागामार्फत वितरित करण्यात आलेले सोयाबीन बियाणे पेरले. मात्र अनेक ठिकाणी या बियाण्यांची उगवणच झाली नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. याबाबत काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारीही दाखल केल्या आहेत.

ईट कृषी मंडळांतर्गत सुमारे १४ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होते. यापैकी जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून सर्वाधिक क्षेत्रावर नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. ईट, घाटनांदूर, चांदवड, जोतिबाचीवाडी, नागेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी महाबीज कंपनीसह शासनाच्या योजनेंतर्गत मिळालेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याची तक्रार केली आहे.

कमी पावसामुळे पुरेशी ओल नसतानाही पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. रिमझिम पावसानंतर काही ठिकाणी सोयाबीनची उगवण चांगली झाली; मात्र आता या पिकावर गोगलगायी आणि 'पैसा' किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या किडीमुळे जोमात आलेले सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

एकीकडे उगवण न झाल्याने दुबार पेरणीचा खर्च, दुसरीकडे अपुरा पाऊस आणि त्यातच गोगलगाय व किडींचा प्रादुर्भाव अशा तिहेरी संकटामुळे परिसरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहेत. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि किड नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT