

औसा, पुढारी वृत्तसेवा : औसा तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा ओढ दिल्याने आणि गेल्या काही दिवसांपासून सतत वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणात लांबल्या आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीची बहुतांश कामे पूर्ण केली असली, तरी पुरेसा ओलावा नसल्याने अनेकांनी पेरणी थांबवली आहे. परिणामी, संपूर्ण तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही शेतकऱ्यांनी प्रारंभीच्या पावसावर विश्वास ठेवून घाईघाईत पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने आणि कोरडे वारे वाहू लागल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे पेरलेले बियाणे उगवेल की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता असून दुबार पेरणीचे संकटही गडद होऊ लागले आहे.
गेल्या चार दिवसांपासून आकाशात ढंग तर येत आहेत पण वाऱ्याच्या वेगाने तसेच पुढे जात असल्याने तालुक्यातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. ग्रामीण भागात या वाऱ्याला कुंभारी वारे म्हणतात. या कुंभारी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा जूनपासून अद्यापपर्यंत म्हणावा तसा पाऊसही पडलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
आधीच पेरण्यांना उशीर झाल्याने दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याची भूमिका अनेकांनी घेतली आहे. दुसरीकडे, आणखी किती दिवस पावसाची वाट पाहायची, असा प्रश्न उपस्थित करत काही शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला आहे. तरीही औसा तालुक्यात 74 हजार हेक्टर्सपैकी फक्त 1200 हेक्टर्सवर पेरणी झाली असून बाकी ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्या ढगाळ वातावरण असले तरी समाधानकारक पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचे सर्व नियोजन विस्कळीत झाले आहे. वेळेत पेरणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच हवामानातील सततच्या बदलांमुळे पिकांवर बुरशीजन्य रोग व विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरीप हंगामात पेरणी होण्यासाठी आता औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, दमदार आणि सलग पावसाची प्रतीक्षा आहे.
ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा देत, किमान ७० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर किंवा जमिनीत पुरेसा 'वापसा' निर्माण झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. अपुऱ्या ओलाव्यात पेरणी केल्यास बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असल्याचे कृषी तज्ज्ञ अरुण गुट्टे यांनी सांगितले.