Achlabet Devsthan 
धाराशिव

Achlabet Devsthan Dharashiv: अचलबेट देवस्थान पायथ्याशी भव्य रिंगण सोहळा; टाळ-मृदंगाचा गजर, 'ज्ञानोबा-तुकोबा' च्या अखंड जयघोषाने भाविकांना भक्तिरसात न्हाऊ घातले!

डोक्यावर तुळशी वृंदावन महिला, टाळकरी, विणेकरी रिंगण सोहळ्यात धावले

पुढारी वृत्तसेवा

शंकर बिराजदार

उमरगा : तालुक्यातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थानच्या पायथ्याशी गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी, (दि. २९) आयोजित भव्य गोल रिंगण सोहळ्याने हजारो भाविकांना भक्तिरसात न्हाऊ घातले. टाळ-मृदंगाचा गजर, 'ज्ञानोबा-तुकोबा'च्या अखंड जयघोषात आणि वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक उत्साहात हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.

राज्याचा सीमेवर सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गा लगतउमरगा शहरापासून दहा किमी अंतरावर कराळी तुरोरी शिवारात उंच डोंगरावर निसर्ग सौंदर्याने नटलेले अचलबेट देवस्थान आहे. देवस्थानला प्राचीन काळातील ऋषि मुनींचा व साधु संतांच्या योग साधनेचा वारसा लाभला आहे. तर वैकुंठवासी हभप उज्वलानंद महाराज यांनी देवस्थानचा विकास तसेच परिसरातील गावात अध्यात्मिक प्रचार व प्रसार केला आहे. दरवर्षी दत्त जयंती, श्रावण महिना, पौर्णिमा, गुरुवार तसेच वर्षभरात हजारो भाविकाची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी होते. गेल्या तीन वर्षांपासून सद्गुरू उज्ज्वलानंद महाराज यांची मुर्ती व पादुकांचा पालखी रथ, अश्व आणि दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर काढण्यात येते.

यावर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त औराद शहाजानी (जि लातूर) येथून सोमवारी (दि २७) पादूका रथ दिंडी निलंगा, कासार शिर्शी, मुळज, तुरोरी मार्गे बुधवारी (दि २९) सायंकाळी अचलबेट देवस्थान पायथ्याशी दाखल झाली, त्यानंतर कर्नाटकातील एकंबा, उजळंब, नवचंदवाडी, फुलदर वाडी आणि मळगीवाडी येथील पालख्या पायथ्याशी पोहंचल्या. सर्व पालख्यांच्या एकत्रित संगमाने वातावरण अधिक भारावून गेले. यादरम्यान पालखी व दिंडीचे गावोगावी फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता भगव्या पताकाधारी वारकर्यांच्या गोल रिंगणाने सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर डोक्यावर तुळशी वृंदावन महिला, टाळकरी, विणेकरी रिंगण सोहळ्यात धावले.

रिंगणात शेवटी एका अश्वावर चोपदार तर दुसऱ्या अश्वावर सद्गुरू उज्ज्वलानंद महाराज यांच्या पादुका विराजमान असलेले दोन्ही अश्वाचे गोल रिंगण पार पडले, रिंगणात अश्व  धावताना 'ज्ञानोबा तुकाराम' चा गजर आणि वीणा टाळ मृदंगाच्या निनादात भाविकांच्या जयघोषानी परिसर दणाणून सोडला. यावेळी परमार्थ प्रबोधन सांस्कृतिक सेवा मंडळाचे अध्यक्ष भीम महाराज, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उषा गायकवाड, जिपचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, पंचायत समिती सभापती ॲड आकांक्षा चौगुले, जि प सदस्य अर्चना जाधव, ज्योती चौगुले, आर्यतेज चालुक्य, पंस सदस्य तुकाराम जाधव, हभप हरी लवटे आदीसह महाराष्ट्र कर्नाटकातील हजारों भाविक रिंगण सोहळ्याला उपस्थित होते.

अचलबेट देवस्थान परिसरात रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित भाविकांसाठी दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर रात्री बार्शी येथील हभप अनिल पाटील महाराज यांच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्यात पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी पोलिस अधिकारी, पुरूष व महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT