

काटेवाडी (जि. पुणे): काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी! पायघड्या धोतराच्या,झाला गजर हरिनामाचा! कविवर्य मोरोपंतांची कर्मभूमी बारामतीत विसावा घेतल्यानंतर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (दि. १६) इंदापूर तालुक्यात दाखल झाला.
काटेवाडी (ता. बारामती) येथे जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पालखी रथाभोवती वैशिष्ट्यपूर्ण मेढ्याचे रिंगण पार पडले. यावेळी हजारो भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी काटेवाडी येथे धोतराच्या पायघड्या अंथरूण जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साही स्वागत करण्यात आले.
पूर्वी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांची रोगराई दूर होण्यासाठी पालखी रथाभोवती गोल रिंगण घालून मनोभावे वंदन केले होते. तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रद्धेने जपली आहे.
दुपारी ३ वाजता संभाजी काळे, तात्यासो मासाळ, महादेव काळे, सुभाष मासाळ, हरी महारनवर यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. यावेळी उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर केला. या वैशिष्ट्यपूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
बारामती शहरातून शनिवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर पिंपळी लिमटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत पवारांच्या काटेवाडीत विसावला. पालखी स्वागतासाठी परीट समाजातील ननवरे बांधवांच्या वतीने धोतराच्या पायघड्या घालण्यात आल्या.
गावच्या वेशीतून बॅंड पथक, शालेय लेझीम पथक, हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी पालखी खांद्यावरून दर्शन मंडपात नेली. या पालखी सोहळ्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवारआदींनी स्वागत केले.
पालखी सोहळा दर्शन मंडपात विसावल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काटेवाडी येथे पालखीच्या स्वागतासाठी पताका, स्वागत कमानी लावून परिसराची सजावट केली होती. दर्शन मंडप सभागृह फुलांच्या माळांनी सजविले होते. पालखी सोहळा दुपारी विसावल्यानंतर वारकरी भाविकांनी गावात जेवणाचा आस्वाद घेतला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी देखील वारकरी भाविकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भाविकांना वाढले जेवण
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वत: भाविकांना जेवणासाठी आग्रहाने वाढत पंगतीत लक्ष ठेवून होत्या. दुपारच्या विसाव्यानंतर तीन वाजता वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा पार पडला. यावेळी 'बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम' असा गजर करण्यात आला.
रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकाळी गावामध्ये फेरफटका मारून माहिती घेतली. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांच्या स्टॉलला भेट दिली व सोहळ्याच्या स्वागताची उणीव राहू नये, यासंबंधी पाहणी केली.