Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi | "लाखो भाविकांनी अनुभवला नेत्रदीपक रिंगण सोहळा!; खुडूस फाट्यावर माऊलींच्या अश्वाच्या दिमाखदार फेऱ्या"

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण मंगळवारी सकाळी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
Sant Dnyaneshwar maharaj palkhi sohala
Sant Dnyaneshwar maharaj palkhi sohala
Published on
Updated on
Summary

लाखो भाविकांनी अनुभवला नेत्रदीपक रिंगण सोहळा

  • खुडूस फाट्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे गोल रिंगण

  • अश्वाच्या पाच दिमाखदार फेऱ्यांनी वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले

पानीव : विनोद बाबर

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण मंगळवारी सकाळी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. 'ज्ञानोबा-तुकाराम... माउली... माउली...' अशा आकाशाला गवसणी घालणाऱ्या जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या अखंड निनादाने, डौलाने फडकणाऱ्या भगव्या पताकांनी, हरिनामाच्या गजराने आणि माऊलींच्या अश्वाच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी झालेल्या भक्तांच्या उस्फूर्त गर्दीने माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा (पानीव सोटी) परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

Sant Dnyaneshwar maharaj palkhi sohala
Goa AI Traffic Camera | एआय कॅमेऱ्यावरून दंडास तूर्तातूर्ती 'ब्रेक'

लाखो वारकरी आणि भाविकांनी हा नेत्रदीपक रिंगण सोहळा अनुभवला. त्यानंतर खेळलेल्या पारंपरिक खेळ आपल्या नव्यात आणि मनात कायमचे साठवून ठेवले. माळशिरस येथील मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सकाळी वेळापूरच्या दिशेने प्रस्थान करताच संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

सर्वात पुढे रिंगण सोहळ्याने वैष्णवांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सकाळी ९.४५ वाजता मुख्य गोल रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. चोपदारांनी विधीपूर्वक अश्वाला रिंगण दाखवल्यानंतर सर्वांच्या नजरा माउलींच्या अश्वाकडे खिळल्या. काही क्षणांतच माऊलींच्या अश्वाने भरधाव वेगाने मैदानाला सलग पाच दिमाखदार फेऱ्या पूर्ण केल्या.

प्रत्येक फेरीबरोबर 'ज्ञानोबा-तुकाराम', 'माउली... माउली...' या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा निनाद, विठुलनामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात हा सोहळा अधिकच रंगत गेला.

भगव्या पताका खांद्यावर घेतलेले पताकाधारी वारकरी, त्यांच्या पाठोपाठ टाळकरी, वीणेकरी, तुळशीधारक, हंडे वाहणाऱ्या महिला आणि शिस्तबद्ध दिंड्या 'पाऊले हळूहळू चला, मुखी विठ्ठल बोला' म्हणत विठुरायाच्या भेटीची आस मनात ठेवून पुढे सरकत होत्या. अभंग, हरिपाठ आणि विठ्ठलनामाच्या गजरात वारीचा प्रत्येक क्षण भक्तिमय झाला होता.

रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी सकाळी ८ वाजेपासूनच वारकरी आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ८.३० वाजता माऊलींच्या अश्वांचे आगमन होताच अश्वाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये एकच उत्साह संचारला. त्यानंतर सकाळी ८.५० वाजता माऊलींच्या पालखीचे आगमन झाले. पालखीने दिंड्यांसह संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा घालत मध्यभागी स्थान घेतले. याप्रसंगी ग्रामस्थ आणि मान्यवरांनी पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले.

अश्वाच्या प्रत्येक फेरीनंतर त्याच्या टापांखालील पवित्र माती मस्तकी लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी अश्वाचे दर्शन घेत भावविभोर होत नम्रतेने माती मस्तकी लावली. श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा हा क्षण उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला. अश्वाने पाच फेऱ्या पूर्ण केल्यानंतर पालखीजवळ येताच भाविकांनी जल्लोषात जयघोष केला आणि संपूर्ण मैदान भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.

रिंगण सोहळ्यानंतर वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारे फुगड्या, पिंगळा, हमामा, हुतुतू, काटवट यांसारखे पारंपरिक खेळ रंगले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला आणि पुरुष वारकरी देहभान, वय आणि थकवा विसरून या खेळांमध्ये सहभागी झाले. 'माउली... माउली...' आणि 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या अखंड नामघोषात भक्ती आणि आनंदाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला.

दिंड्यांचा हा महासागर, भगव्या पताकांनी ढोलदार दृश्य, टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड घोष आणि माऊलींच्या अश्वाच्या पाच दिमाखदार फेऱ्यांनी सजलेला खुडूस फाटा (पानीव सोटी) येथील दुसरा गोल रिंगण सोहळा यंदाच्या वारीतील अविस्मरणीय अध्याय ठरला. हा अलौकिक सोहळा डोळ्यांत साठवत आणि सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनात बाळगत लाखो वारकरी पुढील मुक्कामासाठी वेळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.

Summary

तुकोबांच्या पालखीतील पहिल्या उभ्या रिंगणाने माळिनगर विठ्ठलमय

  • रिंगण सोहळ्यात हरिनामाचा गजर ; वातावरण झाले भक्तिमय

  • मानाच्छा अश्वाच्या नेत्रदीपक दौडीने हजारो वारकरी भारावले

माळिनगर : गोपाळ लावंड

माळिनगर येथे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण मंगळवारी (दि. २१) सकाळी ८.४५ च्या सुमारास माळिनगर येथे अभूतपूर्व आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. पालखी महामार्गावरील रिंगणस्थळी मानाच्या अश्वाने घेतलेल्या नेत्रदीपक दौडीने हजारो वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. टाळ-मृदंगाचा अखंड निनाद, 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण माळिनगर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

पंधरा दिवसांपासून पंढरपूरच्या दिशेने अखंड हरिनाम घेत मार्गक्रमण करणारा वारकरी संप्रदाय माळिनगरमध्ये दाखल होताच भक्तीचा महासागर उसळला. पालखी महामार्गावर झालेल्या उभ्या रिंगणात मानाच्या अश्वाने घेतलेली भरधाव दौड पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

अश्व रिंगणात धावताना 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने आसमान दुमदुमून आणि प्रत्येक वारकरी तो अविस्मरणीय क्षण आपल्या डोळ्यांत साठवून ठेवत होता. कपाळी अष्टगंध, गळ्यात तुळशीमाळ, हातात टाळ-मृदंग आणि मुखी विठ्ठलनामाचा अखंड गजर अशा वातावरणात संपूर्ण माळिनगर विठ्ठलमय झाले होते.

Sant Dnyaneshwar maharaj palkhi sohala
SIR Campaign Election | 'एसआयआर सुरू आहे... 1 ऑगस्टनंतर या' सातपूर विभागीय कार्यालयात नागरिकांना हेलपाटे

पालखी स्वागतासाठी माळिनगर ग्रामपंचायत, दि सासवाड माळी शुगर फॅक्टरी, महात्मा फुले पतसंस्था, शुगरकेन सोसायटी, विविध सामाजिक संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दि सासवाड माळी शुगर्स फॅक्टरीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन पालखी पूजन व अभिषेक माळी शुगर्सचे संचालक गणेश इनामके व भारती इनामके या दांपत्याने केले.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माळिनगर ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, माळी शुगर्सचे विविध विभाग, पोलिस प्रशासन तसेच स्वयंसेवकांनी भाविकांच्या सोयीसाठी उत्कृष्ट नियोजन करून चोख व्यवस्था ठेवली. त्यामुळे संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत

पालखी सोहळा मार्गस्थ होताना पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या घटल्याची जाणवत होते. तसेच माळिनगर येथील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे वाहनांची गर्दी देखील झाली नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news