Declaring a wet drought in Dharashiv district
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी भरघोस मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. ओला दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये आणि फळबागांना प्रती हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देणे यासह इतर अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टी आणि पूर यामुळे मोठा हाहाकार माजला आहे. पुराच्या पाण्यात माणसे, जनावरे आणि उभे पीक वाहून गेले, तर काही जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्याने त्वरित उपाययोजना कराव्यात, असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
निवेदनात शेतकऱ्यांसाठी सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव, कापणी प्रयोग रद्द करून सरसकट पीक विमा, उडीद आणि कांद्याची एकत्रित मदत, तसेच ऊस उत्पादकांवरून शेतकऱ्यांच्या बिलातून होणारी कपात रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. धीरज पाटील, जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तसेच सयाजी देशमुख, प्रकाश चव्हाण, बालाजी बंडगर, विलास शाळू आणि शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे उपस्थित होते. काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून मागण्यांची तातडीने पूर्तता करण्याची विनंती करण्यात आली.