Crowd of devotees for darshan of Khanderaya at Andur
अणदूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील लेखी करार-पद्धतीने देव देण्या-घेण्याची ऐतिहासिक परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री खंडोबाची यात्रा (सटीची जत्रा) शुक्रवारी (दि.२१) मोठ्या भक्तिभावाने व धार्मिक कार्यक्रमाने पार पडली. सोमवारी पहाटे चार वाजता काकडा आरतीनंतर परिसरातील भाविक दंडवत घालून आपापले नवस फेडणे, श्रींच्या मूर्तीला अभ्यंगस्नान घालून अभिषेक व विविध धार्मिक विधी पूर्ण करण्यात आली.
दिवसभर मंदिरात भाविक तळीभंडार उचलणे, ओटी भरणे, भंडार-खोबरे उधळणे, लहाण मुलांचे जावळ काढणे, लंगर तोडणे, नवीन मुरळी, वारुंना दिक्षा देणे आदी कार्यक्रम पार पडले. सायंकाळी मानाची काठी मिरवणुक, वाघ्या-मुरळी नृत्य आदी कार्यक्रम मंदिर परिसरात पार पडले. रात्री दहा वाजता श्रींचा अश्वरुपी सवाद्य छबीना काढून मंदिराला दोन प्रदक्षिणा घातल्या जातात. यावेळी हलगीच्या तालावर खंडोबाचे वारु बेभान होऊन नाचतात. हे विलोभनीय दृष्य पाहण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहातात छबीना मिरवणुकीनंतर ज्येष्ठ वारुकडून आगामी वर्षाची भाकनूक (भविष्य) सांगितले जाते.
रात्री बारा वाजता नळदुर्गचे मानकरी श्रींच्या मूर्तीला मैलारपूर (नळदुर्ग) येथे नेण्यासाठी सवाद्य मिरवणुकीने येतात. यावेळी त्यांचे स्वागत करून यात्रा कमिटीच्या वतीने मानपान देऊन दोन गावांमध्ये देव देण्या-घेण्याचा करार होऊन दोन्ही गावांतील पंचाच्या सह्या होतात. त्यानंतर महाआरती होते.
मैलारपूर (नळदुर्ग) येथे पौष पौर्णिमेदिवशी होणाऱ्या उत्सवासाठी हेगडी प्रधानांसह म्हाळसादेवीच्या मूर्तीचे प्रस्थानानंतर श्रींच्या मूर्तीला पालखीतून निरोप देण्यात येतो. आज शनिवारी (दि.२२) पहाटे पाच वाजता मैलारपूर येथील मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. यात्रेनिमित्त अणदूर मंदिरावर औसा येथील रवि नेटके या भक्ताच्या वतीने मोफत आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती.
यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, पोलिस प्रशासन व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. यात्रा कमिटीच्या वतीने आज शनिवारी (दि.२२) दुपारी जवाहर महाविद्यालयाच्या कुस्ती आखाड्यात भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. या कुस्ती स्पर्धेत १०० रुपये पासून लाख रुपयांपर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणावर मल्लांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कट्टा ग्रुप युवा ग्रुपच्या वतीने यात्रेकरूंसाठी सलग दुसऱ्या वर्षी मोफत अन्नदान सेवा ठेवण्यात आली होती.