

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव यंदा २० डिसेंबर ते ४ जा-नेवारीदरम्यान पार पडणार असून या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सर्व तयारी अंतिम करण्यात आली.
जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस तहसीलदार माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, पुजारी मंडळाध्यक्ष विपिन शिंदे, अमरराजे कदम, अनंत कोंडो, आरोग्य विभागाचे अविनाश ढगे, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन चौधर तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी पूजाविधींच्या उपस्थित होते.
बैठकीत महोत्सवात होणाऱ्या प्रमुख धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, भक्त व्यवस्थापन, आयोजनासह स्वच्छता व वाहतूक व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा झाली. महोत्सवाचा प्रारंभ २० ते २८ डिसेंबरदरम्यान सुरू राहणाऱ्या मंचकी निद्रा विधीने होणार आहे.
२८ डिसेंबर रोजी पहाटे देवींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होणार असून दुपारी १२ वाजता घटस्थापना केली जाणार आहे. २९ डिसेंबरला रथ अलंकार महापूजा, ३० डिसेंबरला मुरली अलंकार महापूजा तर ३१ डिसेंबर रोजी जलयात्रा आणि शेषशाही अलंकार महापूजा पार पडेल.