Case Registered Against Three Individuals for Possessing Swords in Terkheda
रत्नापूर पुढारी वृत्तसेवा (ता. वाशी) : लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे विनापरवाना लोखंडी तलवार बाळगल्याप्रकरणी तेरखेडा येथील तिघांवर येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (ता. १६ एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास बसस्थानकाजवळील पुलाखाली करण्यात आली. रेहान हारुण सय्यद (वय १९), मोहसीन शब्बीर सय्यद (वय ३१) आणि अब्दुल हारुण सय्यद (वय २१, सर्व रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे ११.१० वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथील पुलाखाली व बसस्थानकाजवळ काही तरुण संशयास्पदरीत्या थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी वरील तिन्ही संशयित आरोपींकडे विनापरवाना बेकायदेशीररित्या लोखंडी तलवार आढळून आली.
हे कृत्य नागरिकांच्या सुरक्षेस धोका निर्माण करणारे असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५०० रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी संदेश पंडित क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात भारतीय शस्त्र कायदा कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.