Bhoom heavy rain  pudhari photo
धाराशिव

Bhoom heavy rain : भूम प्रशासनाचे नियोजन पुन्हा पाण्यात!

दुधना नदीला पूर; बेदरवाडीचा संपर्क तुटला, सोनगिरी पुलावरून पाणी

पुढारी वृत्तसेवा

भूम : तालुक्यात सोमवारी (दि. ३) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. पाथरूड परिसरातील दुधना नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे बेदरवाडी गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला. आंबी येथे अंबिका देवी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले, तर सोनगिरी गावाजवळील पुलावरून पाण्याचा वेगवान प्रवाह सुरू झाल्याने भूम-सरमकुंडी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. भूम शहरातून वाहणाऱ्या बाणगंगा नदीलाही मोठा पूर आला असून, नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू आहे.

दरम्यान, पाथरूड–बागलवाडी रस्त्यावरील पुलाचा प्रश्न गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांनी केला आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणीही करण्यात आली. वृत्तपत्रांमधूनही हा प्रश्न मांडण्यात आला. मात्र, आजवर परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

पुलाजवळ पवनचक्की कंपनीमुळे निर्माण झालेला अडथळा अद्याप हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाचे नैसर्गिक पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे अॅड. विलास पवार यांनी सांगितले. भविष्यात मोठा पाऊस झाल्यास पूल व रस्ता वाहून जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

या मार्गावरून शासकीय दवाखान्यात जाणारे रुग्ण, परिसरातील वस्ती, शाळकरी विद्यार्थी, बागलवाडी व इंचीवाडी येथील नागरिक तसेच वैजनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास संभाव्य दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पाथरूड–बागलवाडी पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचा अडथळा दूर करावा, पूल व रस्त्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT