भूम : शहरासह तालुक्यात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. सोमवारी कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले असून पुढील काही दिवसांत ते 41 ते 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दुपारच्या कडक उन्हामुळे शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा व चौक ओस पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून सकाळी व सायंकाळीच काही प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे. अनेकजण गमछे, रुमाल, टोपी आणि छत्रीचा वापर करून उन्हापासून बचाव करताना दिसत आहेत.
भूम शहरात वाढलेले सिमेंटीकरण आणि सिमेंटची घरे यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसभर साठलेली उष्णता रात्रीही कमी होत नसल्याने नागरिकांना झोपेचा त्रास व अस्वस्थता जाणवत आहे. परिणामी दिवसासोबतच रात्रीही उकाड्याचा सामना करावा लागत आहे.उन्हाच्या वाढत्या झळांमुळे शेतकरी, मजूर, बांधकाम कामगार आणि रस्त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.
दरम्यान, थंड पेये, उसाचा रस, लिंबूपाणी, ताक व आईस्क्रीम विक्रेत्यांकडे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामानातील बदलाचे संकेत देणारी ही उष्णतेची लाट असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करून स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आवश्यक ठरत आहे.
उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष
उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयात उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करून नागरिकांच्या आरोग्याची घेतलेली काळजी अत्यंत स्तुत्य आहे. दरम्यानच्या काळात, त्याला थंड, सावलीच्या ठिकाणी झोपवावं. ओल्या कपड्याने त्याचं शरीर पुसून घ्यावं. त्याच्या डोक्यावर साधं पाणी टाकत राहावं. एकंदरीत त्याच्या शरीराचं तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा वेळेवर उपचार व योग्य खबरदारीमुळे उष्माघाताचा धोका कमी करण्यास मोठी मदत होणार आहे असे भूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.आर.खराडे यांनी सांगितले.
पाणी भरपूर प्या
सध्याच्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जास्त प्रमाणात पाणी प्या, नारळ पाणी घ्या, शरबत घ्या, भरपूर पाणी मात्रा असणारे फळे घ्या. आहारामध्ये हलक्या आहाराचे सेवन करा तसेच डोक्यावरती टोपी तोंडाला स्कार्फ गॉगल्स प्रामुख्याने उन्हापासून वाचण्यासाठी वापरावे असे डॉ.प्रदीप मोरे यांनी सांगितले.