Women Protest pudhari photo
धाराशिव

Dharashiv Water Shortage : हातात घागरी, हंडे घेऊन ठिय्या

गोसावीवाडी येथील पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समितीसमोर आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

भूम : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना पाणीटंचाईचे संकटही गडद होत आहे. विहीर व बोअरवेल अधिग्रहणाच्या मागण्या वाढत असल्या तरी प्रशासकीय दिरंगाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. गोसावीवाडी येथील पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील महिलांनी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

गोसावीवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, पाणीस्रोत अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ महिलांनी हातात घागरी व हंडे घेऊन दुपारी बाराच्या सुमारास गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला.

मात्र, वाजे प्रशासकीय कामानिमित्त बाहेरगावी असल्याने उपस्थित नव्हते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, बाजार समितीचे माजी संचालक युवराज तांबे आणि पंचायत समितीचे ए. एम. भोंगे यांनी महिलांशी चर्चा केली. प्रशासकीय नियमांच्या अधीन राहून मागणीवर लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT