अब्बास सय्यद
भूम : तालुक्यात यंदा दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. पिण्याच्या पाण्यापासून जनावरांच्या चाऱ्यापर्यंत आणि रोजगारापासून शेतीच्या प्रश्नांपर्यंत सर्वच आघाड्यांवर नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांतील जलस्रोत आटल्याने पाणीटंचाई गंभीर झाली आहे. टंचाई निवारणासाठी ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीकडे उपाययोजनांचे प्रस्ताव दाखल होत असले, तरी टँकर मंजुरीला विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
आंबी, गोसावीवाडी, वाल्हा, गिरवली आणि बिरोबाची वाडी येथून काही दिवसांपूर्वी पाणीटंचाईबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. यापैकी गिरवली आणि बिरोबाची वाडी येथे पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, टँकरची मागणी करूनही शासनाच्या नियम व अटींमुळे अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
या गावांतील जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांना दूरवरून डोक्यावर घागरी घेऊन पाणी आणावे लागत आहे. अनेक गावांत घरगुती पाणी भरण्याची जबाबदारी महिलांवर असल्याचे चित्र आहे. आटलेल्या विहिरी आणखी खोल करण्याची वेळही ग्रामस्थांवर आली आहे.
दुष्काळाची झळ माणसांपेक्षा जनावरांना अधिक बसत आहे. गोठ्यातील जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. चाऱ्याचे दर वाढल्याने जनावरांचे पालन करणेही कठीण झाले आहे. साधारणपणे या काळात शेतशिवारात हिरवा चारा उपलब्ध असतो; मात्र यंदा पावसाअभावी शिवार ओसाड पडले आहे.
त्यामुळे अनेक शेतकरी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, खरेदीदार मिळत नसलेल्या जनावरांची उपासमार होत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी उपलब्ध पाणी अडवून साठवण्याच्या उपाययोजनांवर पुरेसे काम झाले नसल्याची भावना शेतकऱ्यांत आहे.
त्यामुळे यंदाच्या भीषण पाणीटंचाईत पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने उपाययोजना न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तातडीने उपाययोजना करा
तालुक्यात सध्या चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई आहे. काही भागांत चारा छावण्यांना मंजुरी द्यावी. ज्या गावांत पाणी उपलब्ध आहे, तेथील जलस्रोतांचे अधिग्रहण करावे, तर ज्या गावांत पाण्याचा स्रोतच उपलब्ध नाही, तेथे टँकरच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी सूरज गाढवे यांनी दै. पुढारीशी बोलताना केली.