लातूर, पुढारी वृत्तसेवा: राजस्थानमधील कोटा येथे नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याने कोचिंग इन्स्टि्टयूटच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले. ही घटना रविवारी घडली. अविष्कार संभाजी कासले (रा.उजना, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
अविष्कारचे पार्थिव गावी आणण्यासाठी त्याचे पालक व नातेवाईक कोट्यास रवाना झाले आहेत. या घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. परंतु, चाचणी परीक्षेत कमी गुण पडल्याने आलेल्या नैराश्यातून अविष्कारने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
अविष्कारचे आई-वडील अहमदपूर येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. अविष्कार हा कोटा येथे तीन वर्षांपासून होता. तो तेथे नीट परीक्षेची तयारी करीत होता. दरम्यान, रविवारी तो इन्स्टि्टयूटमध्ये चाचणी परीक्षा देण्यासाठी आला असता त्याने सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
हेही वाचा