ZP Election: 949 renames in Vaijapur city
वैजापूर, पुढारी वृत्तसेवा नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदार यादीत ९४९ मतदारांची नावे दोन किंवा अधिक ठिकाणी आढळली आहेत. यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील नावे समाविष्ट आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जन्हाड यांनी या मतदारांना एकाच ठिकाणी नाव ठेवण्यासाठी संमतीपत्र भरून देण्याचे आवाहन केले आहे.
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने दुबार नावे हटवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या यादीनुसार, वैजापूर नगर परिषद हद्दीत ९४९ मतदारांची नावे दोन किंवा अधिक वेळा नोंदवलेली आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी झालेल्या तपासणीत २६० मतदारांची नावे शहरी व लगतच्या ग्रामीण भागात एकापेक्षा जास्त ठिकाणी सापडली आहेत. काही मतदार अनेक वर्षांपूर्वी वैजापूरमधून स्थलांतरित झाले असूनही त्यांची नावे येथील यादीत आहेत.
अशा मतदारांची नोंद इतर ठिकाणी असल्यास वैजापूरमध्ये नाव असणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. एकाच व्यक्तीचे दोन किंवा अधिक ठिकाणी नाव असणे, किंवा दोनपेक्षा जास्त मतदान ओळखपत्र असणे हे भारतीय न्याय संहिता कलम १७१ नुसार फौजदारी गुन्हा आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून अशा संभाव्य दुबार मतदारांना प्रपत्र-अ पाठवले जात आहे. मतदारांनी हे संमतीपत्र भरून संबंधित मतदान केंद्राच्या बीएलओकडे जमा करावे. एकापेक्षा जास्त ओळखपत्र असल्यास तीही बीएलओकडे जमा करावीत. विहित मुदतीनंतर कारवाई होणार असल्याने सर्व मतदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन डॉ. जहऱ्हाड यांनी केले आहे.