

Five and a half year old girl goes missing from Pisadevi-Palshi road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पिसादेवी ते पळशी रस्त्यालगत असलेल्या ओंकार सिटी या बांधकाम साईटवर मजुरी करणाऱ्या मध्यप्रदेशच्या दाम्पत्याची साडेपाच वर्षांची मुलगी राशी शिनू चव्हाण मंगळवारी (दि.११) दुपारी दोनच्या सुमारास खेळता-खेळता अचानक बेपत्ता झाली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अप-हरणाचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर उपविभागीय अधिकारी पूजा नागरे, चिकलठाणाचे निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी धाव घेत शोध सुरू केला आहे. चिकलठाणा पोलिसांच्या दोन पथकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकही शोधात सहभागी झाले असून, बुधवारी (दि.१२) रात्री उशिरापर्यंत चिमुकलीचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. राशीचे आई-वडील ती बेपत्ता झाल्यापासून प्रचंड धक्क्यात आहेत.
अधिक माहितीनुसार, शिनू रामा चव्हाण (२३, रा. मूळ मध्यप्रदेश) हा पत्नी तीन अपत्यांसह पळशी पिसादेवी रस्त्यावरील बांधकाम साईडवर कामासाठी आला आहे. तिथे अन्य चार दाम्पत्याही मजुरी कामासाठी तिथेच इमारतीच्या खाली वास्तव्यास आहेत. शिनू यांची साडेपाच वर्षांची मुलगी राशी अन्य लहान्यांसोबत इमारतीच्या परिसरात खेळत असे.
मंगळवारी ती खेळता खेळता दुपारी २ वाजे. नंतर गायब झाली. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही. अखेर चिकलठाणा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे, पीए-सआय धुळे, उत्तम नागरगोजे आदींसह पथकांनी धाव घेत शोध सुरू केला. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची ३ पथके राशीचा शोध घेत आहेत.
परिसरातील रानमळा, ओढे, विहिरीमध्ये शोध
बांधकाम साईड ही पिसादेवी ते पळशी या मुख्य रस्त्यावर आहे. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने परिसरातील विहिरी, ओढ्यांमध्ये बुधवारी दिवसभर शोध घेतला. त्यानंतर रानमाळ पालथे घातले. पळशी, पिसादेवी रोड ते आजूबाजूच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र राशीचा काहीही ठावठिकणी लागला नाही. तिचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे.