

New Water Scheme: The scheme has already gone from Rs 1680 crore to Rs 2740 crore
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदार कंपनीला शंभर कोटींची भाववाढ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र शिवसेना उबाठा पक्षाने अशी भाववाढ देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
शहराची पाणीपुरवठा योजना आधीच १६८० कोटींवरून २७४० कोटींवर गेली आहे. शिवाय योजनेचे कामही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे आता कसली भाववाढ देता ? असा सवाल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने सन २०२० मध्ये तब्बल १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. तिचे कंत्राट हैदराबाद येथील जी. व्ही. पी. आर. इंजिनिअरिंग कंपनीस देण्यात आले. चार वर्ष होऊनही ही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. दरम्यान, या योजनेचा समावेश केंद्राच्या अमृत २ मध्ये करण्यात आला. त्यानंतर योजनेचा खर्च १६८० कोटींवरून २७४० कोटींवर गेला.
आता पुन्हा ठेकेदार कंपनीस एकदा भाववाढ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जीव्हीपीआर इंजिनिअरिंग कंपनीने २२ सप्टेंबर २०२५ रोजी जीवन प्राधिकरण कार्यालयाला पत्र लिहून आपल्याला भाववाढ फरक देण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर आधी जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी अशी भाववाढ देता येणार नाही, असे पत्र १० ऑक्टोबर २०२५ रोजी जीव्हीआर कंपनीला दिले. मात्र, त्यानंतर मुख्य अभियंता पलांडे यांनीच २४ ऑक्टोबर २०२५ रोजी जीव्हीपीआर कंपनीला दुसरे पत्र देत भाववाढ देण्यास नकार देणारे आपले पत्र परत घेत असल्याचे कळविले. शिवसेना उबाठा पक्षाने अशी भाववाढ देण्यास विरोध दर्शविला आहे.