छत्रपती संभाजीनगर : प्रेम प्रकरणातून एका तरुणास शनिवारी (दि.१३) दुपारी सिडको बसस्थानक येथून एका २३ वर्षीय तरुणांचे कारमधून तिघांनी अपहरण केले. त्याला बेदम मारहाण करून पुन्हा सिडको बसस्थानकात आणून सोडले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशाल आबासाहेब येडके असे अपहृत तरुणाचे नाव आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुरेश मोहन नरवडे (३५, रा. एसटी कॉलनी, मुकुंदवाडी) यांनी तक्रार दिली. नरवडे हे सिडको बसस्थानक परिसरात नाश्ता सेंटर चालवतात. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा भाचा विशाल आबासाहेब येडके यश इंगळे, विक्की घोरपडे, असे सर्वजण सिडको बसस्थानक परिसरात आले होते. काळी वेळानंतर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आली त्यातून तिघेजण उत्तरले. ते विशा-लजवळ आले. हमको पहचाना क्या, असे म्हणत विशालला मारहाण सुरु केली.
तसेच, सर्वांसमोर त्याला बळजबरी कारमध्ये कोंबून अपहरण केले. त्याला बेदम मारहाण करून पुन्हा त्याला सिडको बसस्थानक परिसरात आणून सोडले. त्यानंतर सुरेश नरवडे यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. नरवडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पचलोरे करीत आहेत.
प्रेमप्रकरणातून अपहरण
ज्या मुलीसोबत विशालचे प्रेमप्रकरण आहे, तिला घेऊन तो एक वर्षापूर्वी पळून गेला होता. दोन्ही कुटुंबीयांच्या पाठपुराव्यानंतर ते माघारी परतले होते. दरम्यान तेव्हापासून विशाल विरुद्ध मुलीचे कुटुंबीय संतप्त होते. यातून अनेकदा वादही उफाळला होता. दरम्यान याचेच रुपांत शनिवारी झालेल्या अपहरणात झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.