वाळूच्या कमिशनवरून रिक्षा अडवून तरुणाचे अपहरण file photo
छत्रपती संभाजीनगर

Kidnapping youth : वाळूच्या कमिशनवरून रिक्षा अडवून तरुणाचे अपहरण

देवगाव रंगारीतून १२ तासांत तिघांच्या आवळल्या मुसक्या; सेव्हनहिल ब्रिजजवळील थरार

पुढारी वृत्तसेवा

Youth kidnapped after stopping rickshaw over sand commission

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूच्या ३० ते ४० ट्रकच्या कमिशनच्या वादातून भररस्त्यात रिक्षा अडवून एका तरुणाचे अपहरण करण्यात आल्याचा थरार सोमवारी (दि. २०) मध्यरात्री सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली घडला. आरोपींनी तरुणाला महिंद्रा थार कारमध्ये डांबून देवगाव रंगारी येथे नेले आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्याचे कपडे फाडले. या प्रकरणात जवाहरनगर पोलिस आणि गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, थार कार जप्त केली आहे.

जाफर ऊर्फ गुड्डू आयुब शेख (३३), जावेद अमिन शेख (२०) आणि अनस आयुब चाऊस (१८, सर्व रा. देवगाव रंगारी) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली. मुख्य आरोपी उदय मोतीलाल मरमट ऊर्फ राजपूत (रा. झोलेगाव फाटा, ता. वैजापूर) हा आणि त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

फिर्यादी फकीरचंद ऊर्फ मनीष शामसिंग महेर (२९, रा. अजबनगर, मूळ रा. पेंढापूर, ता. गंगापूर) यांच्या तक्रारीनुसार, ते वाळू विक्रीत मध्यस्थी करण्याचे काम करतात. सोमवारी (दि.२०) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ते रिक्षाने घरी जात होते. सेव्हनहिल ब्रिजखालील बसस्टॉपजवळ त्यांच्या रिक्षाला एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. त्यांनी मनीष यांना बळजबरीने रिक्षातून बाहेर काढले. त्याचवेळी मागून आलेल्या एका काळ्या रंगाच्या महिंद्रा थार कारमधून उदय मरमट ऊर्फ राजपूत, जावेद शेख, अनस चाऊस आणि गुड्डू अय्युब शेख हे उतरले. उदयने लाकडी दांडक्याने मनीषला मारहाण केली आणि सर्वांनी मिळून त्याला उचलून थार गाडीत टाकले.

कपडे फाडून मारहाणीचा काढला व्हिडिओ

आरोपींनी मनिषचे अपहरण करून त्याला थेट देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील एका जुन्या बंगल्यासमोरील मोकळ्या जागेत नेले. आरोपी उदय राजपूत याला मनीषने ३० ते ४० ट्रक वाळूची ऑर्डर दिली होती. मात्र त्याने मनीषला डावलून परस्पर वाळू विकली आणि त्याचे कमिशन दिले नाही. याच रागातून आरोपींनी मनीषला शिवीगाळ करत दांडक्याने बेदम मारहाण केली. त्याचे कपडे फाडले आणि हा अमानुष प्रकार स्वतःच्या मोबाईलवर चित्रित करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

१२ तासांत आवळल्या मुसक्या

अपहृत तरुणाला मारहाण केल्यानंतर आरोपींनी सेव्हनहिल जवळच आणून सोडले. सुटका झाल्यानंतर त्याने जवाहरनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर गुन्हे शाखा, जवाहरनगर पोलिसांनी देवगाव रंगारीतून तिघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, एसीपी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सचिन कुंभार, देवगाव रंगारी ठाणे प्रभारी सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक गोदेकर, हवालदार राजेंद्र साळुंके, योगेश गुप्ता, श्रीकांत काळे आर्दीच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT