Work on 'NO' network slows down due to lack of laborers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यापूर्वी नो नेटवर्क भागातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेची धावपळ सुरू आहे. मात्र, अंतर्गत पाइपलाइनच्या कामासाठी आवश्यक असलेले मजूर दिवाळीच्या सुटीवरून अद्याप परतले नसल्याने कामाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे सध्याची १५० मजुरांची संख्या २५ नोव्हेंबरपर्यंत ३५० आणि त्यानंतर ५०० पर्यंत वाढविण्याचे आदेश कंत्राटदार कंपनीला दिल्याची माहिती आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.
शहराच्या २ हजार ७४० कोटींच्या पाणी योजनेचे काम अंतिम श्रीनगर महानगरपालिका छत्रपती संभा मुख्य प्रशासकीय इमारत टप्प्यात आहे. शहरातील १ हजार ९०० किलोमीटर अंतर्गत पाइपलाइनपैकी आतापर्यंत १ हजार ३०० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. दूषित पाण्याच्या समस्या दूर करण्यासाठी आणखी १०० किलोमीटर पाइपलाइन तातडीने टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिवाळीपूर्वी ३५० मजूर कामावर होते. सुटीमुळे सुमारे २०० मजूर गावी गेल्याने काम थांबले होते. सध्या १५० मजूर परतले असून, त्यांच्याकडून पाइपलाइनमधील गॅप जोडण्याचे काम सुरू आहे.
नव्या योजनेतून नळजोडणी देण्यासाठी महापालिकेने धोरण निश्चित केले असून, नागरिकांना अर्जाचे वाटप केले जात आहे. आतापर्यंत सात हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जासाठी मालमत्ता कर भरणे बंधनकारक आहे. ज्यांच्यावर अद्याप कर आकारणी झालेली नाही, त्यांना आधी कराची आकारणी करून घ्यावी लागणार आहे.
पाइपलाइन तपासणीला लागणार दीड महिना
सातारा-देवळाई परिसरातील चार पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी घेण्यात आले आहे. मात्र, अंतर्गत पाइपलाइनमधील गॅप जोडणे आणि प्रत्येक पाइपलाइनची स्वतंत्र तपासणी करणे बाकी आहे. ही कामे आव्हानात्मक असल्याने आणखी दीड महिना लागण्याचा अंदाज आयुक्त अमोल येडगे यांनी व्यक्त केला. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कामांना वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.