Sillod News : सिल्लोड नगरपरिषदेत शिवसेनेचा झंझावात File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sillod News : सिल्लोड नगरपरिषदेत शिवसेनेचा झंझावात

अब्दुल समीर २३,५४६ मतांनी विजयी, सत्तारांच्या नेतृत्वावर पुन्हा जनतेची मोहोर

पुढारी वृत्तसेवा

With 25 corporators, the Shiv Sena hoisted its saffron flag in the municipal council.

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीत सिल्लोडच्या मतदारांनी पुन्हा एकदा ठामपणे सिद्ध केले की, माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचे नेतृत्व अजूनही शहराच्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कुणी कितीही मारा बाता, आमदार अब्दुल सत्तारच आमचा नेता ही भावना मतपेटीतून स्पष्टपणे व्यक्त झाली. शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर यांनी तब्बल २३ हजार ५४६ मतांच्या विक्रमी मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत २५ नगरसेवकांसह नगरपरिषदेत शिवसेनेचा भगवा फडकावला.

मतमोजणीच्या दिवशी सकाळपासून आयटीआय परिसर गजबजून गेला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदानानंतर जवळपास तीन आठवडे मतमोजणी रखडल्याने उमेदवार, समर्थक आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता व धाकधूक निर्माण झाली होती. मात्र निकाल लागताच शिवसेना समर्थकांमध्ये जल्लोष उसळला.

नगराध्यक्ष पदावर अब्दुल समीर यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असतानाही मताधिक्याबाबत उत्सुकता होती. प्रत्यक्ष मतमोजणीत अपेक्षेपेक्षा मोठे मताधिक्य मिळाल्याने अब्दुल समीर यांच्यासह माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत झाल्याचे चित्र दिसून आले. पराभूत उमेदवारांच्या चेहऱ्यावरची नाराजी सत्तार यांनी आपल्या राजकीय परिपक्वतेने फार काळ टिकू दिली नाही. विजयाच्या क्षणीच त्यांनी तिन्ही पराभूत उमेदवारांना स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात स्थान देण्याची घोषणा केल्याने राजकारणात दिलदारपणाचा आदर्श निर्माण झाला.

प्रभाग क्रमांक ५ मधून शिवसेनेचे सुधाकर पाटील अवघ्या चार मतांनी विजयी झाले, तर भाजपाच्या स्नेहल शिनगारे व प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपाचे कमलेश कटारिया ५१ मतांनी आणि रेखा भूमकर ८६ मतांनी निवडून आल्या. उर्वरित बहुतांश नगरसेवक मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. सिल्लोड नगरपरिषदेत सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा मान प्रभाग क्रमांक १२ मधील पठाण रईस मुजावर यांनी २ हजार ९४८ मतांनी पटकावला. शेख रऊफ बागवान १९९९ पासून सलग सहाव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह माजी नगरसेवक गुलशेरखा पठाण कोतवाल यांच्या घरात सातव्यांदा तर विठ्ठल सपकाळ यांच्या घरात सहाव्यांदा नगरसेवकपद आले आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीपासून माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचा जो आत्मविश्वास होता, तो अखेरपर्यंत कायम राहिला आणि त्याच आत्मविश्वासावर नगर परिषदेचा निकाल लागला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर यांनी एकूण ४० हजार ८९६ मतांपैकी ३१ हजार ४३८ मते, म्हणजेच जवळपास ७८ टक्के मतदान मिळवत खऱ्या अथनि जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाचा मान मिळवला. या निवडणुकीत भाजपाचे मनोज मोरेल्लू वगळता इतर सर्व उमेदवारांची अनामत जप्त झाली.

मतमोजणीनंतर नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह शिवसेनेच्या २५ नवनिर्वाचित नगर-सेवकांनी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांच्या हस्ते, निरीक्षक हरीश धार्मिक यांच्या समक्ष विजयी प्रमाणपत्रे स्वीकारली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कारभारी दिवेकर व संजय देवराये यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर फुलांची उधळण, गुलाल, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शिवसेनेचा विजय असो, आमदार सत्तार आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांतून भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली.

सिल्लोड नगरपरिषद निवडणूक निकालाने शहराच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला असून, अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा निर्विवाद विश्वास टाकल्याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.

सिल्लोड नगरपरिषदेच्या १४ प्रभागांतील २८ नगरसेवक व थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) येथे शांततेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांच्या नियंत्रणाखाली व बीड अप्पर जिल्हाधिकारी हरिश धार्मिक यांच्या निगराणीत ही प्रक्रिया पार पडली. संपूर्ण परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विकासाला गती, शहराच्या अपेक्षांना नवे बळ मिळणार

माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे विजयी नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. स्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते विकास, तसेच युवकांसाठी रोजगार व संधी निर्माण करणे हे प्राधान्याचे मुद्दे असतील, असेही सांगण्यात आले. या दणदणीत विजयामुळे शिवसेना कार्यकर्ते व समर्थकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

भाजपाचा दारुण पराभव, अस्तित्वाची लढाई तीव्र

या नगरपरिषद निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. नगराध्यक्ष पदासाठीच्या भाजप उमेदवाराला आठ हजार मतांचाही टप्पा गाठता आला नाही. २८ पैकी केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागल्याने भाजपचे शहरातील राजकीय अस्तित्व गंभीर संकटात सापडल्याचे चित्र आहे. निकालानंतर भाजप गोटात निराशा पसरली असून, आगामी काळात संघटनात्मक आत्मपरी-क्षणाची गरज अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT