Atul Save : शिक्षक मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी बोलणार file photo
छत्रपती संभाजीनगर

Atul Save : शिक्षक मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी बोलणार

मंत्री अतुल सावे, आमदार बंब यांनी घेतली कुटुंबीयांची भेट

पुढारी वृत्तसेवा

Will speak to the Chief Minister regarding the teacher's death case : Atul Save

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : पोलिस आणि गुन्हेगारी टोळक्याच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक सुरेश बोरसे यांच्या कुटुंबीयांची सोमवारी (दि. १५) मंत्री अतुल सावे आणि आमदार प्रशांत बंब यांनी वेरूळ येथे जाऊन भेट घेतली. बोरसे यांच्या कुटुंबावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई होईल. कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. या प्रकरणात आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत, अशी ग्वाही मंत्री सावे यांनी यावेळी दिली.

पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार बंब यांनी सांगितले की, शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभअसून, शिक्षणाच्या माध्यमातून पिढ्या घडविण्याचे मोठे कार्य तो करत असतो. अशा व्यक्तीची अत्यंत दुर्दैवी आणि क्रूर हत्या होणे ही केवळ एका कुटुंबाची हाणी नसून, संपूर्ण समाजासाठी वेदनादायी घटना आहे.

त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येणे आणि दोषींना कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे. या घटनेतील आरोपी कोणत्याही स्तरावरील असोत, त्यांना कोणतीही राजकीय, सामाजिक किंवा अन्य प्रकारची पाठराखण मिळू देणार नाही. तपास यंत्रणांनी निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास करून संपूर्ण घटनाक्रम जनतेसमोर आणावा, अशी मागणी बंब यांनी केली. गरज भासल्यास आगामी विधिमंडळ अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले जाईल, असेही बंब यांनी सांगितले.

बोरसे कुटुंबीयांशी संबंधित प्रकरणात पाच दिवसांनंतर पोलिस प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे. सोमवारी सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी अग्निहोत्री यांच्या उपस्थितीत बोरसे कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सध्या बोरसे कुटुंबीयांचे सविस्तर जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून तपासाच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित केली जात असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच या प्रकरणासंदर्भातील अधिकृत व सविस्तर माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत किंवा अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात येईल, असेही अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले.

कुटुंबीयांवर अन्याय होऊ देणार नाही

मी स्वतः उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती त्यांच्यासमोर मांडणार आहे. बोरसे कुटुंबाला न्याय मिळावा. त्यांना आवश्यक ती शासकीय मदत मिळावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासन पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे यावेळी मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT