Will demand a wet drought declaration from the Chief Minister: Guardian Minister Sanjay Shirsat
पैठण, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांसह सामान्य गरीब नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरसकट पंचनामे करण्याची सूचना गुरुवारी (दि.१८) सामाजिक न्याय मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. पैठणसह मराठवाड्यात हीच परिस्थिती असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली.
दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार विलासबापू भुमरे यांच्या हस्ते नाथसागर धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पैठण तालुक्याचा पाहणी दौरा केला.
महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित, तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, नगरपरिषद मुख्य अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, धरण उपअभियंता मंगेश शेलार, उद्यान विभागाचे अभियंता तुषार विसपुते, सपोनि ईश्वर जगदाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पाहणी दौऱ्याच्यावेळी याप्रसंगी राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नाथ मंदिर विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, तालुकाप्रमुख अण्णासाहेब लबडे, उपतालुकाप्रमुख राजेंद्र मापारी, माजी शहर प्रमुख तुषार पाटील, नगराध्यक्ष राजूभाऊ गायकवाड, सोमनाथ परदेशी, भूषण कावसानकर, दीपक मोरे यांच्यासह महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ट्रॅक्टर ट्रॉलीत उभे राहून केली नुकसानीची पाहणी
ढोरकीन, मुद्दलवाडी, कातपूर, राहुलनगर, नुकसानग्रस्त परिसराची व पिकांची पाहणी केली. कातपूर येथे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने व जोरदार पाऊस सुरू असल्याने पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीत उभे राहून डोक्यावर छत्री धरून नुकसानीची पाहणी केली. तात्काळ नुकसानीचे सरसकट पंचनामे करा, अशा सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या.