Wildlife Census : बुद्ध पौर्णिमेला रात्रभर मचाणावरुन वन्यप्राणी गणना file photo
छत्रपती संभाजीनगर

Wildlife Census : बुद्ध पौर्णिमेला रात्रभर मचाणावरुन वन्यप्राणी गणना

गौताळा अभयारण्यात शालेय मुलींना अनोखा अनुभव

पुढारी वृत्तसेवा

Wildlife Census Conducted Overnight from Watchtowers on Buddha Purnima

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : वन्यजीव संवर्धनाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित मवन्यप्राणी गणना २०२६फमध्ये भक्ती कोल्हे व पलक कोल्हे या शालेय विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवत प्रेरणादायी आदर्श घालून दिला. गौताळा औट्रमघाट अभयारण्यातील ब्राह्मणी विभाग (कंपार्टमेंट १५४) येथे बुद्ध पौर्णिमेच्या शीतल चंद्रप्रकाशात या विद्यार्थिनींनी वनविभागाच्या पथकासह रात्रभर मचाणावर बसून वन्यजीवांचे निरीक्षण व मोजणी केली.

निसर्ग शाळेचा अनोखा अनुभव विभागीय वनअधिकारी रेवती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक विशाल लोंढे आणि सहाय्यक वन्यजीव रक्षक सचिन शिंदे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम पार पडली.

यात कुमारी भक्ती संतोष कोल्हे (इयत्ता ८ वी) व कुमारी पलक योगेश कोल्हे (इयत्ता ९ वी) यांनी वनरक्षक एस. जी. सोनार, व्ही. एस. नवले, कोमल व्ही. पाटील तसेच वनमजूर सुनील चव्हाण यांच्या सोबत चिंचवाडी ओढ्यालगत असलेल्या कृत्रिम पाणवठ्यावरील मचाणावर मुक्काम केला.

चिंचवाडी ओढ्याला उगमस्थानापासून अनेक नैसर्गिक डोह आहेत. मात्र, मे महिन्यातील तीव्र उन्हामुळे या डोहांतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. यावर उपाय म्हणून वन्यजीव विभागाने ओढ्यालगत सखल व उंचवट्यांवर कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. पर्णगळतीमुळे जंगल मोकळे झाल्याने या पाणवठ्यांवर तहान भागवण्यासाठी येणाऱ्या वन्यजीवांचे दर्शन सहज घडले.

या मोहिमेत सहभागी झालेल्या भक्ती आणि पलक यांनी शिस्तबद्ध पद्धतीने व पूर्ण शांतता राखत वन्यजीवांच्या नोंदी घेतल्या. आपल्या अनुभवाबद्दल त्यांनी सांगितले, जंगलातील शांतता आणि चंद्रप्रकाशात वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणे हा आमच्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता. पुस्तकात वाचलेले प्राणी प्रत्यक्ष पाहिल्याने निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधिक स्पष्ट झाले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मिळा-लेली माहिती अत्यंत प्रेरणादायी होती. उन्हाळ्यातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असलेल्या बुद्ध पौर्णिमेला मचाणावरून प्राण्यांचे निरीक्षण करणे सुलभ होते. या प्रगणनेतून प्राण्यांची संख्या, नर-मादी गुणोत्तर आणि नव्या प्रजातींबाबत महत्त्वाची माहिती संकलित करण्यात आली. हिंस्त्र प्राण्यांचा वावर असलेल्या क्षेत्रात रात्रभर संयमाने निरीक्षण करणाऱ्या या दोन्ही विद्यार्थिनींचे वनअधिकाऱ्यांनी कौतूक केले.

१९३ वन्यप्राण्यांची नोंद

तालुक्यातील गौताळा अभयारण्यात १ ते २ मे पर्यंत सकाळी सात वाजेपर्यंत वन्यप्राणी गणना हा उपक्रम यशस्विरीत्या राबविण्यात आला. या गणनेत विविध वनपरिक्षेत्रांतील मचाणांवरून निरीक्षण करून वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. गणनेदरम्यान ससा, रानडुक्कर, उदमांजर, नीलगाय, कोल्हा, हरीण, वानर, सायाळ आदी प्रजातींची नोंद झाली. एकूण २१ मचाणांवरून निरीक्षण करण्यात आले असून १९३ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. यात रानडुकरांची संख्या सर्वाधिक असून त्यापाठोपाठ हरीण, वानर व इतर प्रजातींचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT