Which was the first political rebellion in Maharashtra?
उमेश काळे
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील सहा खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षातून बाहेर पडल्यामुळे राज्यात आतापर्यंत झालेल्या राजकीय बंडाळीची चर्चा सुरू असल्याचे दिसते. या बंडाचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसमधील काही मंडळींनी पक्षत्याग करून तत्कालिन नेतृत्वाला आव्हान देत शेतकरी कामगार पक्षाची २६ एप्रिल, १९४८ रोजी स्थापना केली होती. हे महाराष्ट्रातील पहिले राजकीय बंड असावे, असे जुन्या राजकीय निरीक्षकांना वाटते.
महाराष्ट्रातील बंड म्हटले की पुलोद, शरद पवार, छगन भुजबळ व अन्य शिवसेना नेते, अजितदादा पवार या प्रमुख बंडांची उदाहरणे दिली जातात. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रदेश काँग्रेसमधील काही नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले होते, त्यातून शेकापची स्थापना झाल्याचे दाखले इतिहासात आहेत. अर्थात हे बंड आमिषापोटी झाले नव्हते, त्यास तात्विक बैठक होती, हे लक्षात घ्यावयास हवे.
सांगोला (जि. सोलापूर) येथील प्रा. डॉ. तानाजी फुलारी यांनी शेतकरी कामगार पक्ष स्थापनेचा ऐतिहासिक मागोवा या संशोधनपर लेखात यासंबंधी १९४७ नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झालेल्या घडामोडींचे सविस्तर विवेचन केले आहे. केशवराव जेधे, शंकरराव देव, बाळासाहेब खेर आदींचा पक्षात प्रभाव होता. ब्रिटिशांनी कायद्यात सुधारणा करून काही प्रांतांना स्वायतता दिली, त्यात महाराष्ट्राच्या काही भागाचा समावेश करीत मुंबई प्रांताची निर्मिती केली होती. या प्रांताच्या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाल्यानंतर बाळासाहेब खेर हे पहिले मुख्यमंत्री झाले.
नवे सरकार शेतकरी आणि कामगारांच्या हिताचा विचार करीत नाही, अशी टीका जेधे यांच्याकडून सुरू झाली आणि संघटनात्मक निवडणुकीत जेधे गट प्रभावी ठरला व ते प्रदेशाध्यक्ष झाले. जेधे यांनी सरकारकडे शेतकरी हिताच्या काही मागण्या केल्या. त्यात शेतकर्यांची कर्जे माफ करावीत, शेतसारा कमी करावा, आदिवासी कल्याणाच्या योजना राबवाव्यात अशा मागण्यांचा समावेश होता. या मागण्यांची दखल खेर सरकारने न घेतल्यामुळे पक्षातंर्गत असंतोष वाढत गेला. जेधे यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे यासाठी चाळीस आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
जेधे, मोरे यांचे सरकारवरच टीकास्त्र
खेर सरकार सामान्य जनतेचा विचार करीत नसल्याची काही आमदार व नेत्यांची भावना होती. जेधे यांना क्रांतिसिंह नाना पाटील, तुळशीदार जाधव, पी. के. सावंत, यशवंतराव चव्हाण, राम नलावडे, शंकरराव मोरे आदींचा पाठिंबा होता. या मंडळींनी पुणे येथे ११ सप्टेंबर, १९४६ रोजी एकत्र येत शेतकरी, कामकरी, बहुजन समाजाच्या हितासाठी शेतकरी कामकरी संघाची स्थापना केली. पक्षात राहूनच या गटाने काम करावे, असा निर्णय झाला.
शेतकर्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरे काढण्याचे ठरले. तेव्हा जेधे, मोरे यांनी सरकारवरच टीका करण्यास प्रारंभ केला. पुढे या गटाची ११ जानेवारी, १९४७ रोजी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत अनेक आमदारांनी शेतकरी संघाची गरज प्रतिपादन केली, परंतु यशवंतराव चव्हाण, सोनुसिंग पाटील यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. शेतकरी कामकरी संघाच्या नेत्यांनी आळंदी, नगर येथे घेतलेल्या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यानच्या काळात काँग्रेसचे नेते शंकरराव देव यांची केंद्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जेधे प्रभूतींवर दबाव आणण्यास सुरवात केली.
त्यातच अखिल भारतीय काँग्रसचे मुंबईत २४, २५ एप्रिल, १९४८ रोजी अधिवेशन झाले. या अधिवेशनात काँग्रेसमध्ये काम करणार्यांना दुसर्या पक्षात, उपपक्षात अथवा संघटनेत काम करता येणार नाही, असा ठराव मंजूर झाला. त्यामुळे सरकारविरोधी संघर्ष करणार्या जेधे व अन्य काही नेत्यांना पक्षातून बाहेर पडण्यावाचून पर्यायच राहिला नाही. या नेत्यांची अधिवेशनाच्या दुसर्याच दिवशी २६ एप्रिलला बैठक झाली आणि काँग्रेसमधून बाहेर पडून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली. या पक्षाचा अल्पावधीतच विस्तार झाला.
मराठवाड्यातील बैठक
निझाम राजवटीतून मुक्त झाल्यानंतर मराठवाड्याचा भाग तेव्हा हैदराबाद स्टेटशी जोडल्या गेला होता. हैदराबाद काँग्रेसमध्येही गटतट होते. भाई उद्धवराव पाटील, नरसिंगराव देशमुख, भाऊसाहेब भोकरदनकर, ज्ञानोबा पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, खुशालराव मोताळे, अंकुशराव घारे आदींनी मराठवाड्यात शेकापची उभारणी केली. १९४९ झाली धाराशिवजवळ असलेल्या काटी येथे बैठक झाली.
काँग्रेस पक्षात राहून शेतकरी, कामकरी, शेतमजूर, दलित समाजाचे प्रश्न सोडविता येणार नाहीत. त्यासाठी स्वतंत्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना मराठवाड्यात केली पाहिजे व हा पक्ष मुंबईत स्थापन झालेल्या शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित असेल, अशी घोषणा उद्धवराव पाटील यांनी केली. (संदर्भ - महाराष्ट्राचे शिल्पकार भाई उद्धवराव पाटील, लेखक - प्राचार्य व. न. इंगळे) काही दिवसांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या उपस्थितीत बार्शी येथे झालेल्या विराट सभेमुळे पक्ष विस्तारण्यासाठी मोठी मदत झाली.
१. बाळासाहेब खेर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून
काँग्रेसमधील काही नेत्यांनी फुटून २६ एप्रिल, १९४८ रोजी केली होती शेकापची स्थापना
२. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचा खेर, शंकरराव देव यांना होता आशीर्वाद,
संघटनेत प्रभाव असूनही केशवराव जेधे सारखे नेते राहिले दुर्लक्षित
३. मराठवाड्यात भाई उद्धवराव पाटील, अण्णासाहेब गव्हाणे, नरसिंगराव देशमुख आदींनी केला पक्षाचा विस्तार, सरकार विरोधी आवाज दाबण्यासाठी अ.भा. अधिवेशनात ठराव