Water supply to 138 villages in Kannad taluka is at risk
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुका येथील ग्रामपंचायतींकडे वीजबिलाची मोठ्या प्रमाणावर थकबाकी जमा झाल्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा धोक्यात आला आहे. तालुक्यातील तब्बल १३८ ग्रामपंचायतींकडे सुमारे १२ कोटी २० लाख ६१ हजार ५२३ रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामपंचायतींकडे गावांना पाणीप-रवठा करण्यासाठी एकूण २५२ वीज कनेक्शन आहेत. या कनेक्शनद्वारे विहिरींमधून पाणी उपसा करून नागरिकांना पुरवठा केला जातो. मात्र वाढत्या थकबाकीमुळे महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलली जात असून, काही ठिकाणी विहिरींचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनातील अधिकारी ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून थकीत वीजबिल भरण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. तरीही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रामपंचायतींनी तातडीने थकबाकी भरावी आणि प्रशासनानेही पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कार्यकारी अभियंता रमेश वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपव्यवस्थापक राजेंद्रसिंग गिरासे उपकार्यकारी अभियंता विक्रम राठोड, पिशोर उप कार्यकारी अभियंता सुजीतकुमार गुल्हाने यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन वीजबिल भरण्यासाठी संपर्क करत आहे.
पाणी टंचाईची भीती
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळी-वरील तणावामुळे इंधनटंचाईचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.