Water Supply Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Water New Scheme : नवीन योजनेचे पाणी दाखल, नळ कोरडेच

२० जलकुंभ, ७०० किमी अंतर्गत जलवाहिनीचे काम अपूर्ण; मुख्यमंत्री शहरात, पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

Water from the new scheme has arrived, yet the taps remain dry

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहरात असतानाच शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमृत-२ अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहरात दाखल झाले असले तरी वितरण व्यवस्था अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी मिळत असून, जलवाहिनी फुटल्यास तब्बल १५ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. जलवाहिनीचे नेटवर्क नसलेल्या भागातील नागरिकांची तहान टँकरवरच भागविली जात आहे.

शहराला नवीन योजनेतून पाणी देण्यासाठी ऑक्टोबर २०२५ मध्ये डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील आढावा बैठकीत मार्च २०२६ मध्ये शहराला पाणी देण्याचे आदेश झाले. मात्र या दोन्ही मुदती उलटून गेल्या. आता योजनेचे पाणी शहरात आले असले तरी ते प्रत्येक भागातील नागरिकांच्या नळापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक कामे अद्याप सुरू आहेत.

अमृत-२ अंतर्गत २७४० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतून १५००, २००० आणि ११०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून हर्मूल-जटवाडापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन आहे. नक्षत्रवाडी ते जटवाडा या १८ किलोमीटर अंतरातील जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे.

मात्र जलवाहिनीची स्वच्छता, जलकुंभांची साफसफाई आणि पाईपलाईन दुरुस्तीची कामे सुरू असल्याने प्रत्यक्ष वितरणाला विलंब होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शहरात असताना नवीन योजनेच्या कामांची प्रगती आणि आगामी घोषणांपेक्षा शहरवासीयांच्या नळाला नियमित पाणी नेमके कधी येणार, याकडेच आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हायड्रॉलिक चाचणीचा अडसर

नवीन टाकलेल्या जलवाहिन्यांची हायड्रोलिक चाचणी आणि पाईपलाईन स्वच्छतेची कामे सध्या सुरू आहेत. संबंधित जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाल्याशिवाय त्यातून नियमित पाणी सोडता येणार नाही. त्यामुळे सिडको-हडकोसह काही भागांना नवीन योजनेच्या पाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. उर्वरित २००० आणि ११०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठीही वेळ लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT