Waste Segregation Demonstration: Commissioner Warns of Penal Action Starting April 1st
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात असताना गुरुवारी (दि. २६) सूतगिरणी चौक, इंदिरानगर परिसरात आयोजित स्वच्छता रॅलीदरम्यान मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी नागरिकांना कडक शब्दांत इशारा दिला. आज शिकवायला आलो आहे; मात्र यापुढे ठोकायला येणार, असे सांगत त्यांनी कचरा वर्गीकरणाबाबत शिस्त पाळण्याचे आवाहन केले.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आयोजित या रॅलीत परिसरातील नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आयुक्त श्रीकांत यांनी स्वतः पुढाकार घेत योग्य पद्धतीने कचरा वर्गीकरण कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मात्र प्रात्यक्षिक सुरू असताना एका नागरिकाने प्लास्टिकची रिकामी बाटली चुकीच्या डब्यात टाकण्याचा प्रयत्न केल्याने आयुक्तांनी तात्काळ नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आज केवळ समज देण्यासाठी आलो आहोत. मात्र १ एप्रिलपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
या इशाऱ्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये काहीशी खळबळ उडाली, तर अनेकांनी कचरा वर्गीकरणाचे महत्त्व गांभीयनि घेतल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला उपायुक्त नंदकिशोर भोंबे (घनकचरा विभाग), नगरसेवक नंदू गवळी, स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव, सतीश खरात, लता राऊत आणि अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीच्या माध्यमातून कचरा वर्गीकरणाबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले
कचरा फक्त घंटागाडीतच टाका
या रॅलीदरम्यान रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये. प्लास्टिकचा वापर टाळावा, असे सांगत नागरिकांनी घरातील कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ शहरासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले