Voting is being held today for eight seats, including the Fulambri Nagar Panchayat.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाच्या आदेशानंतर रद्द ठरलेल्या फुलंब्री नगरपंचायतीसह पैठण, गंगापूर व वैजापूर येथील एकूण आठ जागांसाठी शनिवारी (दि.२०) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. २१) जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमधील व एका नगरपंचायतीमधील निवडणुकांची मतमोजणी केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्ह्यात फुलंब्री नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासह १७ सदस्यांच्या निवडीसाठी तसेच पैठण येथील ४, वैजापूर येथील २ व गंगापूर येथील २ जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी फुलंब्री येथे १९, पैठणमध्ये १०, वैजापूरमध्ये ७, तर गंगापूरमध्ये मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. फुलंब्रीतील चार मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
या निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २०० महसूल व पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी मॉकपोल झाल्यानंतर साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात होणार असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.
संपूर्ण मतदान प्रक्रियेवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त रुषीकेश भालेराव लक्ष ठेवून असणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रे संबंधित स्ट्रांग रूममध्ये जमा करण्यात येणार आहेत. सात ठिकाणी असलेल्या स्ट्रांगरूमच्या सुरक्षिततेसाठी एकूण ४७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त भालेराव यांनी दिली.
दरम्यान, मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीची महत्त्वाची कागदपत्रे, संवैधानिक आणि असंवैधानिक लिफाफे, ईव्हीएम मशीनची मेमरी कोषागार कार्यालयातील लॉकरमध्ये ठेवण्यात येते. त्यामुळे तालुका स्तरा-वरील सर्व उप कोषागार कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
१० वाजता मतमोजणीला सुरुवात
फुलंब्री, पैठण, वैजापूर आणि गंगापूर येथे २० डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच म्हणजे २१ डिसेंबर रोजी २ डिसेंबर रोजी आणि २० डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेची मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि एक नगरपंचायत अशा सातही ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. वैजापूर येथे १२, पैठण येथे १५, गंगापूर १०, सिल्लोड १२, कन्नड १२, खुलताबाद १०, तर फुलंब्रीत १० अशा एकूण ८७ टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर तीन या प्रमाणे अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व निकाल लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.