Voter lists for municipal elections to be published today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळा- पत्रकानुसार महापालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार केल्या आहेत. या याद्या प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाने दोन वेळा कार्यक्रमात बदल करून तारखा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. अखेर आज (दि.२०) या प्रारूप याद्या महापालिकेच्या १० झोन कार्यालयांमध्ये सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग रचना तयार केली. त्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली. या सोडतीसोबतच महापालिका निवडणूक विभागाने प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे कामही सुरू केले होते. ही प्रारूप मतदार यादी आयोगाच्या वेळापत्रकानुसार ६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती, परंतु ऐनवेळी मतदार याद्या प्रसिद्धीच्या तारखांमध्ये बदल करून आयोगाने सुधारित वेळापत्रक काढले. त्यानुसार १४ नोव्हेंबर रोजी मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. मात्र ही तारीखही पुढे ढकलत २० नोव्हेंबर रोजी यादी प्रसिद्ध करण्याबाबत सुधारित वेळापत्रक काढले. आयोगाच्या तारीख पे तारीखकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. आयोगाने हेच वेळापत्रक कायम ठेवले आहे.
प्रभागनिहाय तयार केलेल्या प्रारूप मतदार याद्या आज सकाळी ११ वाजता सर्व १० झोन कार्यालयांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
सूचना-हरकतींसाठी ७ दिवस
विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदार याद्या महापालिकेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यामुळे या याद्यांची विभागणी प्रभागनिहाय करून त्या प्रसिद्ध करण्यात याव्यात, असे आदेश आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू असून, आज याद्या प्रसिद्ध होताच त्यावर सूचना हरकतींसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली जाणार आहे. तर प्राप्त हरकतींवर निर्णय घेऊन ५ डिसेंबरपर्यंत अंतिम याद्या प्रसिद्ध करायच्या आहेत. त्यानंतर ८ डिसेंबरपर्यंत मतदार केंद्र निश्चित करून त्या-त्या मतदार केंद्रनिहाय मतदार याद्या १२ डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध करायचे आदेश आयोगाने दिले आहेत.