

छत्रपती संभाजीनगर : इलाज करण्याच्या बहाण्याने आईसह मुलीचा विनयभंग करणाऱ्या भोंदू बाबाला तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड तसेच बाल लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणीही तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा सत्र न्यायधीश ए. आर. उबाळे यांनी सुनावली.
साईनाथ कारभारी गुंजाळ (५५, रा. घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी) असे शिक्षा सुनावलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. या प्रकरणात ३० वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार डिसेंबर २०२० मध्ये फिर्यादीच्या १७ वर्षीय मुलीला उलट्या व पोटाचा त्रास सुरू झाला होता. त्यांनी अनेक दवाखाने करूनही त्रास थांबत नव्हता. तेव्हा त्यांना कुणीतरी घृष्णेश्वर कॉलनीतील साईनाथ महाराजांकडे जाण्याचा सल्ला दिला.
फेब्रुवारी २०२१ मध्ये फिर्यादी कुटुंबासह साईनाथ महाराजाकडे गेली. त्यावेळी मुलीचा त्रास कमी झाल्याने फिर्यादीच्या कुटुंबाचा त्याच्यावरील विश्वास वाढला. ते सकाळ संध्याकाळ महाराजांकडे जाऊ लागले. १३ फेब्रुवारी रोजी भोंदू बाबाने दोघींना वेगवेगळे बसवून डोळे बंद करण्यास सांगितले. आर ोपीने फिर्यादीला पायाचा इलाज करण्याच्या नावाखाली अश्लील वर्तन करून विनयभंग केला. मात्र मुलीला बाबाचा गुण पडलेला असल्याने फिर्यादीने दुर्लक्ष केले. रात्री नऊ वाजेच्या सुमारास आरोपीने त्यांना पुन्हा आपल्या घरी बोलावले व फिर्यादीच्या पतीला, तुझ्यात बायको सांभाळण्याची क्षमता नाही, अशा शब्दांत सुनावले. त्यानंतर मुलीने भोंदू बाबाकडे जाण्यासाठी नकार दिला. भोंदू बाबाने आपल्यासोबत अश्लील चाळे करून विनयभंग केल्याचे मुलीने सांगितले. ७ मार्च रोजी भोंदू बाबाने फिर्यादीच्या पतीला दक्षिणा देण्यासाठी बोलावले म्हणून फिर्यादी पतीसह आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी त्याने पैशाच्या कारणावरून फिर्यादीच्या कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर भयभीत झालेल्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून हरसूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात सहायक लोकभियोक्त अजित अंकुश यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती भोंदू साईनाथ कारभारी गुंजाळ याला विनयभंग प्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातही तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये शिक्षा विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी सुनावली. मात्र ॲट्रॉसिटी अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.