

वाळूज महानगर ( छत्रपती संभाजीनगर ) : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने एकास मारहाण केली होती. याचा राग मनात धरून इतरांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून महिलेच्या पतीला घरात घुसून त्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याचे वाहनामधून अपहरण केल्याची घटना सोमवारी (दि.१७) रात्री वडगाव येथे घडली.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव परिसरात मंगेश (नाव बदलले आहे) हा पत्नी व त्यांच्या एका लहान मुलासह राहण्यास आहे. त्यांच्या घराशेजारी भाड्याने रूम घेऊन राहणारा योगेश जाधव व त्याच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय मंगेशला आला होता. यामुळे त्याने योगेश यास अनेकदा समजावून सांगितले, मात्र तो सतत त्याच्या पत्नीसोबत बोलत असे. यामुळे काही दिवसापूर्वी मंगेशने योगेशला मारहाण केली होती. या प्रकरणी मंगेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी मंगेश हा दुचाकीवरून घरी येत असताना एका अज्ञात चारचाकी चालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिली होती. या घटनेत मंगेश हा दुचाकीवरून खाली पडल्यानंतर वाहनचालकाने त्यास लोखंडी रॉडने मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मंगेश याने तेथून पळ काढला होता.
जिवे मारण्याच्या उद्देशाने वाहनामधून अपहरणाचा प्रयत्न
मंगेश हा सोमवारी (दि.17) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मित्रासोबत घरी जात असताना योगेश हा एएस क्लब जवळ मंगेशचा पाठलाग करत उभा होता. त्यानतंर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास योगेश हा वाहनामधून पाच जणांना सोबत घेऊन मंगेशच्या घरी आला व त्याने मंगेशच्या पत्नीस दार उघडण्यास सांगितले परंतू तिने दार न उघडता त्यास तेथून जाण्यास सांगितले. तेव्हा योगेश व त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या साथिदारांनी घराचा दरवाजा तोडून मंगेश यास जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथा-बुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण सुरु केली. तसेच मंगेश यास बळजबरीने कारमध्ये बसवून ते त्याला कांचणवाडीकडे घेऊन जात होते.
पोलीसांच्या नाकाबंदीमुळे मंगेशचा जीव वाचला
कांचणवाडी जवळ रात्री पोलीसांची नाकाबंदी सुरु होती. आपण आता पकडले जाऊ अशी भिती योगेश व त्याच्या साथिदारांना वाटल्याने त्यांनी मंगेशला कारमधून खाली फेकले. दरम्यान मंगेश याने पोलीस चौकी गाठून पोलीसांना त्याच्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला. दरम्यान पोलीसांनी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मंगेश यास उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. या प्रकरणी मंगेश याने दिलेल्या तक्रारीवरून योगेश जाधव तसेच त्याच्या पाचा अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात वापरलेली वाहनही जप्त
मंगेश यास लोखंडी रॉडने मारहाण करून जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरणाचा प्रयत्न करणारा मुख्य सूत्रधार योगेश नामदेव जाधव (३१, रा. म्हारोळा, ता. पैठण) तसेच दिनेश सोबकचंद मेहर (३४, रा. पेंढापूर ता. गंगापूर) यास गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त केली आहे. ही कामगिरी पोलिस निरीक्षक गजाजनन कल्याणकर, पोलिस उपनिरीक्षक अर्जुन कदम, जमादार योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, दत्तात्रय गढेकर, पोलिस अंमलदार दादासाहेब झारगड, सोमनाथ दुकळे यांनी केली.