Villagers protest in front of the Gram Panchayat office demanding death penalty for Shubham's killers
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील नागद येथे झालेल्या २४ वर्षीय तरुण शुभम रणवीरसिंग राजपूत यांच्या निघृण खुनाच्या घटनेविरोधात शनिवार दि. १८ रोजी ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी गावात निषेध मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. मोर्चातून मारेकऱ्यांना फाशी द्या! अशा घोषणा देत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
१४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास शुभम राजपूत (वय २४, रा. नागद) हा ग्रामपंचायत रस्त्यावरील डीपीजवळून जात असताना सात आरोपींनी संगनमत करून धारदार शस्त्राने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी आरोपी अमोल दशरथ निकम, सचिन दशरथ निकम, शंकर दशरथ निकम, त्रनी गोविंद निकम, अविनाश गोविंद निकम, राजपूत आणि सतीश संतोष राजपूत ऊर्फ ताटू (सर्व रा. प्रेमनगर, नागद, ता. कन्नड), यांनी एका महिलेच्या घरात ये-जा करण्याच्या संशयावरून रागाच्या भरात शुभमवर हल्ला केला होता या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन आरोपींना कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थ व नातेवाईकांनी केलेल्या निषेध मोर्चात सर्व आरोपींना तत्काळ अटक करून न्यायालयीन प्रक्रियेद्वारे फाशीची शिक्षा द्यावी गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी आर- ोपी आणि त्यांच्या कुटुंबीयांना नागद गावातून कायमस्वरूपी हद्दपार करण्यात यावे. तपासावर कोणताही राजकीय अथवा स्थानिक दबाव येऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात यावी. आरोपींच्या मालमत्तेची सखोल चौकशी करून ती शासनाच्या ताब्यात घेण्यात यावी, जेणेकरून गुन्ह्यातील दोषींना कोणताही लाभ मिळू नये, शासनाने या घटनेबाबत तातडीने कठोर कारवाई केली नाही, तर नागद ग्रामस्थांच्या वतीने व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही मोर्चादरम्यान देण्यात आला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
ग्रामस्थांनी शुभम राजपूत यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. शुभम च्या मारेकऱ्यांना फाशी द्या या घो-षणांनी परिसरात दणाणून गेला होता. गावात अनुचित प्रकार घडू नये म्हणून या निषेध मोर्चासाठी ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.