वैजापूर : तालुक्यातील मकरमतपूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत गणित सोडवता न आल्याने चौथीतील विद्यार्थ्याला शिक्षकाने छडीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या पायासह शरीरावर छडीने मारहाण तसेच चेहऱ्यावर चापट मारल्याचा आरोप असून, त्याच्या ओठातून रक्त आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुरुवारी (दि. २४) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस गायकवाड हा २४ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता.
दुपारी १२ वाजता गणिताचा तास सुरू असताना गणित सोडवता न आल्याने शिक्षक राजू डुकरे यांनी संतापून श्रेयसला छडीने मारहाण केल्याचा आरोप आहे. पाय व शरीरावर छडीने मारल्यानंतर चेहऱ्यावर चापट मारल्याने त्याच्या ओठातून रक्त आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शाळेतून घरी परतल्यानंतर श्रेयस याने शिक्षकाने केलेल्या मारहाणीची माहिती वडलांना दिली. त्यानंतर अमृतराव यांनी शिक्षक डुकरे यांना फोन करून घटनेबाबत विचारणा केली. यावेळी 'मी फक्त एकच काठी मारली,' असे सांगून शिक्षकाने फोन कट केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर अमृतराव गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शिक्षक राजू डुकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.