

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी ८३४ कोटी रुपयांच्या 'अनिष्ट तफावती'च्या मुद्द्यावरून तुफान गदारोळ झाला. बँकेने कागदोपत्री २१ कोटी रुपयांचा नफा दाखवला असला, तरी अनिष्ट तफावत गृहीत धरल्यास बँक तब्बल ८१३ कोटी रुपयांच्या तोट्यात असल्याचा घणाघाती आरोप करत आक्रमक सभासदांनी व्यवस्थापकीय संचालक अजय मोटे यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
सभेत बँकेचा ३१ मार्च २०२६ अखेरचा आर्थिक अहवाल सादर करताना सुमारे २१ कोटी रुपयांचा नफा झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, माजी संचालक व सभासद कृष्णा पाटील डोणगावकर यांनी ताळेबंदातील गंभीर त्रुटी आणि आकडेवारीतील बनवेगिरी चव्हाट्यावर आणली.
बँकेची अनिष्ट तफावत ८३४ कोटी रुपयांवर पोहोचली असून, ती वजा केल्यास बँक नफ्यात नसून ८१३ कोटींनी खड्ड्यात आहे, असे स्पष्ट करत त्यांनी व्यवस्थापकीय संचालक मोटे यांना कात्रीत पकडले. सभासदांनी बँकेच्या कर्जवसुलीवरही प्रश्न उपस्थित केले. बँकेतील ३,४९३ कोटी रुपयांच्या ठेवींपैकी १,७९३ कोटी रुपयांची गुंतवणूक सुरक्षित आहे. मात्र, १,६५० कोटी रुपयांच्या अल्पमुदतीच्या कर्जापैकी तब्बल १,२२५ कोटी रुपये थकबाकीत जमा आहेत.
प्रत्यक्षात वसूल न झालेले व्याज उत्पन्न म्हणून दाखवून बँक स्वतःचीच फसवणूक करत आहे. या चुकीच्या नोंदींमुळे विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांवर अनावश्यक देणी दिसत आहेत, असे सांगत बँकेने नोंदी दुरुस्त करून खरी आर्थिक स्थिती जाहीर करण्याची मागणी सभासदांनी केली. यावेळी बँकेचे अध्यक्ष आ. विलास भुमरे, उपाध्यक्ष रामराव शेळके, संचालक खा. कल्याण काळे, आ. संजना जाधव, आ. रमेश बोरणारे, माजी अध्यक्ष अर्जुन गाडे, सुवर्णा जाधव, अब्दुल समीर सत्तार, शेषराव जाधव यांच्यासह अनेक संचालक व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील सर्वसाधारण सभेत अनिष्ट तफावतीची रक्कम बाजूला ठेवून त्यावरील व्याज आकारणी थांबवणे, तसेच शेतकरी सभासदांकडून होणाऱ्या वसुलीत मुद्दलाची रक्कम मुद्दलात आणि व्याजाची रक्कम व्याजात जमा करण्याचा ठराव मंजूर झाला होता. मात्र, प्रशासनाने हा महत्त्वाचा ठराव मागील सभेच्या इतिवृत्तात नमूदच केला नसल्याचा आरोप करत सभासदांनी तीव्र संताप व्यक्त केला. यास बँकेच एमडी अजय मोटे यांना जबाबदार धरत त्यांना हटविण्याची मागणी केली.
सभेत वार्षिक अहवालातील अंदाजपत्रके व लेखापरीक्षण अहवाल चक्क इंग्रजीत असल्यावरूनही सभासदांनी आक्षेप घेतला. शेतकरी, सभासदांना मराठीत अहवाल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. तसेच सभेत झालेली चर्चा व ठराव इतिवृत्तात तंतोतंत नोंदविण्याची मागणी केली. रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे कर्जप्रकरण, दुष्काळामुळे शेतकऱ्यांना कर्जवाटप, सोसायट्यांच्या अडचणी आणि सचिवांच्या मानधनाचा प्रश्नही सभेत उपस्थित झाला.
बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आ. विलास भुमरे यांनी कर्जमाफीची रक्कम प्राप्त होताच शेतकरी व नवीन सभासदांना कर्जवाटप सुरू करण्यात येईल. असा खुलासा केला. इतर ज्या काही मागण्या असतील त्या सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जाईल. असे आश्वासन दिले.
आ. सत्तारांकडून सारवासारव
सभेत गदारोळ वाढल्याने आ. अब्दुल सत्तार यांनी अनिष्ट तफावतीचा प्रश्न केवळ एका बँकेपुरता मर्यादित नसून, संपूर्ण राज्यातील सहकारी क्षेत्राची हीच समस्या आहे. यावर राज्य व केंद्र सरकार तसेच सहकारी संस्थांच्या स्तरावर तोडगा काढावा लागेल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. यावर मंत्री अतुल सावे आणि आ. रमेश बोरनारे यांनीही शासन स्तरावर गांभीर्याने चर्चा सुरू असल्याचे सांगितले.