Diwali Faral Selling : उमेदच्या महिलांची दिवाळी फराळ विक्रीतून १० लाखांहून अधिक कमाई  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Diwali Faral Selling : उमेदच्या महिलांची दिवाळी फराळ विक्रीतून १० लाखांहून अधिक कमाई

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित दिवाळी फराळ महोत्सव २०२५ उपक्रमाला जिल्ह्यातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला

पुढारी वृत्तसेवा

Umed's women earn over 10 lakhs from selling Diwali snacks

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित दिवाळी फराळ महोत्सव २०२५ उपक्रमाला जिल्ह्यातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, महिलांनी केवळ आपल्या कष्टाने तब्बल १० लाख ६६ हजार ७४० रुपयांची उलाढाल केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. १४ ते १८ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या महोत्सवात महिलांनी १०५ स्टॉल्सद्वारे पारंपरिक फराळाचे पदार्थ, पणत्या, शोभेच्या वस्तू आणि दिवाळी उपयोगी साहित्याची विक्री केली. ग्रामीण भागातील महिलांच्या स्वावलंबनाला चालना देणारा हा उपक्रम ठरला आहे.

या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, जिल्हा व्यवस्थापक (मार्केटिंग) सचिन सोनवणे, तसेच जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील तालुका अभियान व्यवस्थापक, अधिकारी-कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आत्मनिर्भरतेला नवी उभारी

महिलांच्या हस्तनिर्मित वस्तूंना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या आत्मनिर्भरतेला नवी उभारी मिळाली आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांनी केवळ आर्थिक उत्पन्न नव्हे, तर आत्मविश्वासाचाही दिवा प्रज्वलित केल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT