Uday Samant : भुमरे, शिरसाट उठावात पुढे, पण मतांचे दान शिंदेंमुळेच file photo
छत्रपती संभाजीनगर

Uday Samant : भुमरे, शिरसाट उठावात पुढे, पण मतांचे दान शिंदेंमुळेच

सामंत यांनी टोचले कान, बंद खोलीतील चर्चेच्या मागणीवरून जंजाळांचाही घेतला समाचार.

पुढारी वृत्तसेवा

Uday Samant: Bhumre and Shirsat were at the forefront of the rebellion, but the votes were secured solely because of Shinde

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील पक्षाची सुमार कामगिरी आणि अंतर्गत लाथाळ्यांच्या कारणांवरून शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (दि. २१) पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे जाहीरपणे कान टोचले. शिंदे, भुमरे उठावावेळी पुढे होते यात शंका नाही, परंतु आपल्याला मिळालेली मत ही एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आहेत याची जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे, असे सामंत यांनी सांगितले. तसेच बंद खोलीत चर्चा घेण्याची मागणी करणाऱ्या उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनाही खडेबोल सुनावले.

शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील शिव-सेना पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. व्यासपीठावर पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, खासदार राहुल शेवाळे, संपर्कप्रमुख विलास पारकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी महापौर त्र्यंबक तुपे आदींची उपस्थिती होती.

शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात पक्ष पदाधिकाऱ्यांनी मतदारयाद्या पुनरीक्षणाचे (एसआयआर) केलेल्या कामाबद्दल सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. तुमच्यात अंतर्गत मतभेद, मनभेद असू शकतात. पण ते बाजूला ठेवून शिवसेना हा एकच गट समजून काम करा. परंतु इथे एकमेकांची मजा बघण्याचे काम सुरू आहे. शिव-सेना हा पक्ष असला तरी ते एक कुटुंबही आहे. आपल्या मतभेदांमुळे हे कुटुंब दुभंगणार नाही याची काळजी घ्या.

आम्ही इथे फारसे येत नाही. परंतु बर्याच गोष्टी आमच्या कानावर येतात. राज्यात गेल्या तीन साडेतीन वर्षांत जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यात शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून समोर आला. परंतु छत्रपती संभाजीनगर महापालिका, जिल्हा परिषदेमध्ये काय झाले हे सर्वांना ठावूक आहे. आपण इथे कमी पडलो. जंजाळ यांनी बंद खोलीत चर्चा करण्याची मागणी केली, परंतु जोपर्यंत ही बंद खोलीतील चर्चेची प्रथा थांबणार नाही तोपर्यंत संघटना वाढणार नाही हे मी इथे स्पष्ट सांगतो. आम्ही रत्नागिरीत गुण्यागोविंदाने राजकारण करतो. इथेही तसे झाले पाहिजे. आपल्याला मिळणारी मत ही एकनाथ शिंदे यांच्या कामांमुळे मिळालेली आहेत, ही जाणीव सर्वांनी ठेवली तर बंद खोलीत चर्चेची गरज भासणार नाही, असेही सामंत यांनी सांगितले.

खोट्या आकडेवारीवरून झापले

उदय सामंत यांनी सुरुवातीला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून एसआयआरच्या कामाचा विधानसभानिहाय आढावा घेतला. शहरप्रमुख विजय वाघचौरे यांनी पश्चिम मतदारसंघातील कामाची माहिती दिली. तर स्वीकृत नगरसेवक शुभम काळे यांनी पूर्व मतदारसंघात साडेतीनशे बूथ असून, आतापर्यंत ६० टक्के काम झाल्याचे सांगितले. मात्र उदय सामंत यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती पडताळत, पूर्वमध्ये साडेतीनशे नाही तर ३२२ बूथ आहेत आणि तिथे केवळ २५ टक्के काम झाले आहे हे स्पष्ट केले. तसेच खोटी माहिती देऊ नका, आमच्याकडे सर्व अपडेट्स आहेत, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT