Rickshaw-Travel Accident : सिहौरहून परतलेल्या महिला भाविकांवर काळाचा घाला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Rickshaw-Travels Accident : सिहौरहून परतलेल्या महिला भाविकांवर काळाचा घाला

रिक्षा-ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात दोन महिला ठार

पुढारी वृत्तसेवा

Two women killed in horrific rickshaw-travel accident

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छोट्या नवरात्रीनिमित्त सिहौर येथे दर्शन व प्रसाद घेऊन परतलेल्या महिला भाविकांवर काळाने घाला घातला. रेल्वेस्थाकावरून रिक्षाने वाळूजकडे जाताना सुसाट ट्रॅव्हल्सचा सामान ठेवण्याच्या साईड डिक्कीचा ३ फूट बाहेर आलेला पत्रा रिक्षात शिरल्याने दोन महिलांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्या जागीच ठार झाल्या. हा भीषण अपघात बुधवारी (दि.१९) पहाटे ४ वाजेच्या सुमारास पंचवटी चौकाजवळ घडला.

लताबाई राजू परदेशी (४७) आणि आशाबाई राजू चव्हाण (३५, दोघी रा. वाळूज) अशी मृत महिलांची नावे असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली. अपघातानंतर पळून जाताना नागरिकांनी ट्रॅव्हल्सचा चालक चेन्नवरी श्रीकांत गुवे (२९, रा. बसवकल्याण, कर्नाटक) आणि क्लिनर राज सुनील बैरागी (२०, रा. मध्यप्रदेश) दोघांना पकडून छावणी पोलिसांच्या स्वाधीन केले.

अधिक माहितीनुसार, वाळूज येथील लताबाई परदेशी, आशाबाई चव्हाण, मंगल गव्हाणे, भारती एकनुरे, सीमा काकडे, अनिता मोतकर, शांताबाई बलैया आणि अन्य दोन अशा दहा महिला जण १७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशातील सिहौर येथे प्रदीप मिश्रा महाराज यांच्या कार्यक्रमासाठी व दर्शनासाठी गेल्या होत्या. बुधवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्या मध्यप्रदेश येथून रेल्वेने शहरात आल्या. स्थानकावर उतरल्यानंतर शोभा वाघ या वगळता अन्य महिला वाळूज येथे जाण्यासाठी रिक्षामध्ये (एमएच-२०-ईएफ-२५५५) बसून निघाल्या.

चार वाजेच्या सुमारास रिक्षा कर्णपुरा थांब्याजवळ येताच नगर नाक्याकडून भरधाव ट्रॅव्हल्स (एमपी-०९-एके-८०१६) हीच उजव्या बाजूचा सामान ठेवण्याची डिक्कीचा दरवाजा उघडा होता. तो जवळपास तीन फूट रस्त्याच्या बाजूने बाहेर हवेत तरंगत होता. तो पत्रा थेट रिक्षात शिरला. पत्रा अडकल्याने रिक्षा पलटी होऊन रस्त्यावर सरळ उभा राहिला. यामध्ये आशाबाई आणि लताबाई दोघींच्या डोक्याला गंभीर मार लागून त्या जागीच ठार झाल्या.

इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले. रिक्षाची मागची उजवी बाजू पूर्णपणे कापली गेली. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. ट्रॅव्हल्सचा चालक पळून जात असताना लोकांनी त्याला पकडून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी जखमींना घाटीत दाखल केले. आशाबाई आणि लताबाई दोघींना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रॅव्हल्सचा चालक व क्लिनरविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक संजय रोकडे करत आहेत.

आईचे छत्र नियतीने हिरावले, कुटुंबावर आघात

लताबाई यांच्या पतीचे निधन झाले असून, त्यांना एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. तर आशाबाई यांचे पती चालक असून, त्यांना दोन मुले आहेत. दोघींच्या निधनामुळे मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र नियतीने हिरावून घेतले. देवदर्शनावरून आल्यानंतर आनंदाने आणलेला प्रसाद घरातल्यांना देण्याच्या उत्सुकतेने निघालेल्या या दोघींवर काळाने असा घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रिक्षाचालकाने वाचविण्याचा प्रयत्न केला, पण...

भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या रस्त्याच्या बाजूने लगेजचा (डिक्की) पत्रा उघडाच असल्याचे रिक्षाचालकाला दिसल्याने त्याने रिक्षा डाव्या बाजूने वळविली. मात्र पत्रा रिक्षाच्या मागच्या बाजूने अडकल्याने लताबाई, आशाबाई यांच्या डोक्याला मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या. रिक्षा पलटी होऊन फिरून ट्रॅव्हल्सच्या समोर फेकल्या गेली होती.

अपघातानंतर तासभर रस्त्यावर पडून

भीषण अपघातानंतर रिक्षातील जखमी महिला तासभर रस्त्यावर मदतीविना पडून होत्या. शुध्दीवर असलेल्या एका महिलेने कुटुंबाला फोन करून घटनेची माहिती दिली. रिक्षाचालकासह अन्य प्रवासी महिला किरकोळ जखमी झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT