Two-wheeler driven directly onto ST bus platform: Passenger safety at risk
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रवाशांना सोडण्यासाठी आलेले नातेवाईक बसस्थानक परिसरात किंवा प्लॅटफॉर्मच्या जवळपास गाडी पार्क करत आहेत. याही पुढे जाऊन गुरुवारी (दि.४) एका नातेवाइकाने चक्क प्लॅटफॉर्मवरच गाडी उभी केली होती. अधिकाऱ्यांना केबीन सुटेना आणि सुरक्षारक्षकांना दुचाकी दिसेना, अशी अवस्था असल्याने मुख्य बसस्थानकावर प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
मुख्य बसस्थानकातून विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात बस जातात. त्यामुळे येथे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ असते. या वर्दळीत अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे येथे सुरक्षा रक्षक, स्वतंत्र पोलिस चौकी आणि प्रत्येक कोपऱ्यावर कॅमऱ्याची नजर आहे. असे असतानाही येथील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे वारंवार दिसून आले आहे. याचाच एक भाग म्हणजे प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या एका नातेवाइकाने दुचाकी चक्क प्लॅटफॉर्मवरच लावल्याचे गुरुवारी दिसून आले.
यामुळे गाडी शोधणाऱ्या प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत होता. मुख्य बसस्थानकावर सुरक्षेबाबत अनेक यंत्रणा असल्या तरी त्या योग्य प्रकारे अंमलात आणण्यात अधिकारी अपयशी ठरत असल्याने याचा मनस्ताप मात्र प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
अधिकारी केबीन सोडून बाहेर यायलाच तयार नसल्याने सुरक्षारक्षकही तेवढ्या गंभीरतेने काम करत नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.