

Security at Harsul Lake Relies on Just Three Guards
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील ३७५ एकर क्षेत्रावर पसरलेल्या हसूल तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सातत्याने अपघात व आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही एवढ्या विस्तीर्ण तलाव परिसरासाठी मनपाकडून केवळ तीन सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या तलावात आतापर्यंत शेकडो नागरिकांनी आपला जीव गमावला असून, प्रत्येक दुर्घटनेनंतर केवळ घोषणांची बरसात केली जाते. यावर प्रत्यक्षात ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र असून, नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेत एकाच दिवशी अवघ्या एका तासात तिघांचा बडून तर एकाने आत्महत्या केल्याने चौघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने निजाम काळात बांधण्यात आलेल्या हसूल तलावातून आजही जुन्या शहरातील काही प्रभागांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या तलावाच्या सुरक्षेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तलावाचा परिसर अत्यंत मोठा असल्याने सर्व भागांवर लक्ष ठेवणे सुरक्षा रक्षकांसाठी अशक्यप्राय ठरत आहे. तसेच अनेक ठिकाणी बसवलेल्या संरक्षणात्मक जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असून काही भाग पूर्णपणे खुले आहेत.
त्यामुळे नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय तलावात प्रवेश करणे शक्य होते. तर पाण्याला अडविण्यासाठी बांधलेल्या भिंतींवरही कोणतीही सुरक्षितता नसल्याने तरुण मंडळी सहजपणे चढून बसतात. निर्जन वातावरणामुळे हा परिसर नशेखोरांसाठीही सुरक्षित ठिकाण ठरत असल्याचे चित्र आहे. या तलावाच्या सुरक्षेसाठी अपुरे मनुष्यबळ ही मोठी अडचण ठरत असल्याचे सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे.
तरीही, अनेक वेळा आत्महत्येच्या उद्देशाने येणाऱ्या व्यक्तींना ओळखून त्यांना समजावून सांगत पोलिसांच्या ताब्यात देण्याचे काम केले जाते. आतापर्यंत शंभरहून अधिक जणांचे प्राण वाचविण्यात यश आले असले, तरी काही जण नजरेआड होऊन जीव गमावतात, ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान रविवारी (दि. ५ एप्रिल) जामुनबन परिसरातून आलेल्या तीन युवकांचा पोहता न आल्याने बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर काही वेळातच दुसऱ्या एका युवकाने सुमारे २४ फूट खोल पाण्यात उडी घेत आत्महत्या केली.
अवघ्या एका तासात चार जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच घालण्साठी मनपाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत असून तलावाभोवती मजबूत फेन्सिग, तुटलेल्या जाळ्यांची दुरुस्ती आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
मनपा प्रशासनाची उदासीनता
हसूल तलावासारख्या संवेदनशील ठिकाणी वारंवार दुर्घटना घडूनही मनपा प्रशासन केवळ कागदी उपाययोजना आखण्यात मग्न असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. अपुऱ्या सुरक्षेमुळे जीवितहानी होत असताना जबाबदारी नसल्याची भावना व्यक्त होत आहे. तलावाच्या सुरक्षेबाबत ठोस निर्णय घेण्यात होणारा विलंब धोकादायक ठरत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप वाढत आहे.