मेव्हण्याची हत्या करणाऱ्या दोघांना १० वर्षे सक्तमजुरी pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar crime : मेव्हण्याची हत्या करणाऱ्या दोघांना १० वर्षे सक्तमजुरी

आरोपींना ठोठावलेल्या दंडाच्या रकमेतून ६० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मृताच्या मुलाला देण्याचे आदेशात नमूद

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : बहिणीला मारहाण का केली, असे म्हणत केलेल्या बेदम मारहाणीत मेव्हण्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी संतोष भिकाजी मोटे (२५) आणि विलास भिकाजी मोटे (४०, दोघे रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपींना ठोठावलेल्या दंडाच्या रकमेतून ६० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून मृताच्या मुलाला देण्याचे आदेशात नमूद केले आहे.

प्रकरणात रमेश उत्तम जाधव (६०, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, २ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ भास्कर जाधव यांनी पत्नी लता हिला शिवीगाळ करून लाकडी दांड्याने माराहण केली.

ही बाब लताने आपल्या भावाला सांगितली. त्यामुळे लताचा भाऊ विलास, संतोष आणि कैलास मोटे व त्यांचा साथीदार अशोक नाडे याने फिर्यादीच्या भावाला लाकडी काठीने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, उपचार सुरू असताना ५ ऑगस्ट २०२१ रोजी भास्कर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणात तपास अधिकारी तथा तत्कालीन निरीक्षक इंगळे व उपनिरीक्षक सचिन वायाळ यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील नितीन धोंगडे आणि अनिल हिवराळे यांनी साक्षीदार तपासले. सुनावणीअंती न्यायालयाने ही घटना पूर्वनियोजित नसून, पत्नीवरील मारहाणीच्या संतापातून अचानक झालेल्या भांडणात घडल्याचे निरीक्षण नोंदविले.

त्यामुळे हा प्रकार खुनाचा नसून, सदोष मनुष्यवध असल्याचा निष्कर्ष काढत दोन्ही आरोपींना भादंवि कलम ३०४ (१) अन्वये १० वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार राधिका वाघ यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT