छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सतर्क झाले असून, सिडको पोलिसांनी मध्यरात्री गस्तीदरम्यान कारमधून संशयितरीत्या फिरणाऱ्या दोघांना पकडले. तपासणीत त्यांच्याकडे गावठी पिस्तूल मिळून आल्याने दोघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई सोमवारी (दि.12) पहाटे 3 वाजेच्या सुमारास जिगीषा स्कूल ते सनी हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली.
राविनाथ रामकृष्ण बर्डे (26, रा. हरिओमनगर, सईदा कॉलनी, हर्सूल) आणि शुभम छगन सलामपुरे (25, रा. जयसिंगपुरा) अशी अटकेतील आरोपींची असून, दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.
मनपा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नाकाबंदी आणि गस्त अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांच्या सूचनेनुसार डायल 112 चे कर्मचारी विनोद खरात आणि उत्तम जाधव हे सोमवारी पहाटे 2:50 वाजेच्या सुमारास एन-7 परिसरात गस्त घालत होते.
जिगीशा स्कूल ते सनी हॉटेल रोडवर त्यांना एक होन्डा सिटी कार (एमएच-14-ईयु-6062) संशयीतरीत्या उभी असलेली दिसली. पोलिसांनी कारमधील व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. संशय बळावल्याने रात्रगस्तीचे अधिकारी उपनिरीक्षक एकनाथ चव्हाण यांना पाचारण करण्यात आले. कारची झडती घेतली असता, आरोपी रवीनाथ बर्डेकडे गावठी पिस्टल आणि मॅगझीन मिळून आले. त्यावरून दोघांना अटक करण्यात आली.
बर्डे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी
गावठी पिस्तूल बाळगणारा मुख्य आरोपी रवीनाथ बर्डे हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वी बेगमपुरा, हर्सूल आणि सातारा पोलिस ठाण्यात बर्डेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ्र्र्र्र्र्र्र