११० बटन गोळ्यांसह दोघांना बेड्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : ११० बटन गोळ्यांसह दोघांना बेड्या

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने कारवाई केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Two arrested with 110 'button' pills

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने कारवाई केली आहे. पंचायत समितीच्या मोकळ्या मैदानावर सापळा रचून दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून नायट्रोसन- १० या नावाच्या ११० गोळ्यांसह १ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मुख्य पुरवठादारासह तिघांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहेबाज रईस शेख (२४ रा. शताब्दीनगर) आणि शुभम रमेश डेरे (२८ रा. शताब्दीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांना या गोळ्या विकणारा मुख्य आरोपी आवेस फारुख बागवान (रा. शताब्दीनगर) याच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पंचायत समितीच्या मोकळ्या मैदानावर काही तरुण नशेच्या गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एनडीपीएसच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी (दि.१३) रात्री ९ वाजेच्या सुमारास पथकाने सापळा रचून शाहेबाज शेख आणि शुभम डेरे यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे नायट्रोसन- १० नावाच्या ११० गोळ्या आढळून आल्या. चौकशीदरम्यान शाहेबाज याने या गोळ्या आवेस बागवान याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उप-आयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, प्रभारी पोलिस उप-आयुक्त (गुन्हे) शर्मिष्ठा घारगे वालावलकर, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, पोलिस उपनिरीक्षक उत्प्रेश्वर मुंडे, सतिष जाधव, देशराज मोरे, विशाल मेटे, नितेश सुंदरडे, सरताज पठाण आणि चालक होमगार्ड पठाण यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT