Sambhajinagar Accident : पुलाचा कठडा तोडून १५ फूट खाली नाल्यात कोसळली ट्रॅव्हल्स

क्लिनर जागीच ठार; २५ प्रवासी जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
sambhajinagar news
पुलाचा कठडा तोडून १५ फूट खाली नाल्यात कोसळली ट्रॅव्हल्सfile photo
Published on: 
Updated on: 

A travel bus broke through the bridge railing and plunged 15 feet down into a drain

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: पुण्यातून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या झिंगबस कंपनीच्या ट्रॅव्हल्सचा केंब्रीज चौकातील पुलावर भीषण अपघात झाला. शनिवारी (दि. १४) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पुलाचा कठडा तोडून तब्बल १५ फूट खाली नाल्यात कोसळली. या थरारक अपघातात ट्रॅव्हल्सचा क्लिनर जागीच ठार झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झिंगबस कंपनीची ट्रॅव्हल्स (एमएच ४३ सीके ०८००) शुक्रवारी रात्री नऊ वाजता निगडी (पुणे) येथून नागपूरसाठी निघाली होती. या बसमध्ये १४ पुरुष, ९ महिला आणि २ लहान मुलांसह एकूण २६ प्रवासी प्रवास करत होते. शनिवारी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान वाहन छत्रपती संभाजीनगरहून नागपूरकडे जात असताना केंब्रीज चौकात समोरून येणाऱ्या वाहनांच्या जोरदार प्रकाशझोतामुळे (फोकस) चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. परिणामी, बस पुलाच्या कठड्याला धडकली आणि भरधाव वेगात असल्याने कठडा तोडून १५ फूट खाली नाल्यात जाऊन कोसळली.

अपघाताच्या वेळी बसमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. बस अचानक नाल्यात कोसळल्यामुळे एकच तारांबळ उडाली. प्रवाशांनी एकमेकांच्या अंगावर पडून धडक खाल्ली, तर काहीजण सीटखाली दबले गेले. अपघाताच्या तीव्रतेमुळे बसमधील कंपार्टमेंटचेही नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच डायल ११२ आणि चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आणि उपचारासाठी मिनी घाटीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल केले.

या अपघातात बसचा क्लिनर साई पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तसेच, नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर आदित्य कोंढारकर (३१) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटीच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने एकेरी वाहतूक सुरू करून दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स नाल्यातून बाहेर काढली. तसेच रस्त्यावर पडलेला कचरा आणि तुटलेला मलबा बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

जखमी प्रवाशांची नावे: समीर माधवे (२३), अभिजीत इंगोले (२९), उमेश रंगनाथ इंगोले (४१, अमरावती), आरव सोनू लोखंडे (९, नागपूर), पायल लोखंडे (२०, नागपूर), राजकन्या चरणदास (५२, अमरावती), नेहल सुनील वाशिक (२८, निगडी पुणे), इशिका कोणीकर (२३), आदित्य कोंढारकर (३१, नागपूर), अनिशा लिखार (२४), पुष्पा बाबर (६२, पुणे), दीक्षिता बनसोडे (२७), राहुल यादव (२६), सुरेश मिरासदर (२५), जावेद डोबाले (३०), चेतन प्रकाश ठाकरे (३२, बोरगाव अमरावती), श्यामल श्यामसुंदर राऊत (२७, बोरगाव अमरावती), सक्षम ठाकरे (२), पवन विलास बरगे (२६, फलटण), शारू मुन (२८), श्रुतिक गौतम वानखेडे (३०, नागपूर), योगेश सुभानराव देशमुख (३३, अमरावती), सोनी जयदीप कांबळे (२५, पुणे), रोहन वसंतराव दळवे (२६, मुखड अमरावती), सागर गंगाधर सपटे (३९, अमरावती) आणि जगन राजू थोरात (४०, अमरावती) यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.