तिरंग्याची रॅली, फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दुमदुमला file photo
छत्रपती संभाजीनगर

तिरंग्याची रॅली, फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत दुमदुमला

विश्वचषकावर भारताने कोरले नाव; गुलमंडीत ऐतिहासिक जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

Tricolour rally after Indian cricket team's victory, fireworks fill the sky

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत विश्वविजेतेपदावर नाव कोरताच, रविवारी (दि.८) रात्री छत्रपती संभाजीनगर शहरात आनंदाचा महापूर लोटला. सामना संपल्याची अधिकृत घोषणा होताच हजारो क्रिकेटप्रेमी तिरंगा हाती घेऊन रस्त्यावर उतरले. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या गगनभेदी घोषणांनी शहरातील मुख्य चौक आणि रस्ते अक्षरशः दणाणून गेले. विशेषतः क्रांती चौक, गुलमंडी आणि टीव्हीसेंटर परिसरात तरुणाईने सणासारखा आनंदोत्सव साजरा केला.

भारताने न्यूझीलंडवर ९६ धावांनी मिळवलेला हा विजय ऐतिहासिक ठरला. विजयाची खात्री पटताच रात्री दहा वाजेपासूनच शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. भारताने शेवटचा चेंडू टाकताच शहरात फटाक्यांची मोठी आतषबाजी झाली की, जणू दिवाळीच साजरी होत असल्याचा भास होत होता. तरुणांनी दुचाकीवर स्वार होऊन शहरातून भव्य रॅली काढल्या, तर काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात क्रिकेटप्रेमींनी ठेका धरला.

विजयाच्या जल्लोषात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिस आयुक्त आणि त्यांच्या पथकाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. क्रांती चौकात रात्री उशिरापर्यंत हजारो तरुणांची गर्दी होती, मात्र पोलिसांनी अत्यंत संयमाने गर्दीवर नियंत्रण मिळवले. रात्री दोन वाजेपर्यंत शहराच्या गल्लीबोळातून विजयाचा जयघोष सुरूच होता.

मोठ्या पडद्यावर अनुभवला थरार : सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी शहरात विविध ठिकाणी जायंट स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. प्रत्येक चौकार आणि षटकाराला होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि विकेट पडताच उधळलेला गुलाल यामुळे वातावरण भारावून गेले होते. विजय मिळवताच चाहत्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावरही टीम इंडियाच्या अभिनंदनाचा वर्षाव झाला असून, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर विजयाचे स्टेटस अन् पोस्टचा पूर आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT