Crime News : कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक, २७ गोवंश जनावरांची सुटका pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक, २७ गोवंश जनावरांची सुटका

फुलंब्री : चौका बसस्थानकाजवळ कंटेनरसह ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Transported for slaughter; 27 cattle rescued

फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : कत्तलीच्या उद्देशाने अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २७ गोवंश जनावरांची फुलंब्री पोलिसांनी सुटका करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २७ बैलांसह कंटेनर असा एकूण ३१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी इरफान शेख मेहमूद (३७, रा. ईदगाहनगर, ता. सिल्लोड) व असलम सुपडू कुरेशी (२२, रा. ईदगाहनगर, ता. सिल्लोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक, प्राण्यांवरील क्रूरता आणि अवैध कत्तलीस प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

त्याच मोहिमेअंतर्गत फुलंब्री पोलिसांनी ही कारवाई केली. २१ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चौका बसस्थानकाजवळ संशयास्पदरीत्या जात असलेल्या कंटेनरची तपासणी करण्यात आली.

यावेळी कंटेनरमध्ये २७ बैलांना अत्यंत अमानुष पद्धतीने दाटीवाटीने कोंबून दोऱ्यांनी घट्ट बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. जनावरांना हालचालीसाठी कोणतीही जागा नसल्याने त्यांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. कारवाईदरम्यान १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे २७गोवंश जनावरे आणि १८ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ३१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सुटका करण्यात आलेल्या गोवंश जनावरांना पाल येथील मातोश्री प्रयागबाई जाधव येथे दाखल करण्यात आले. आरोपींकडे जनावरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध परवानगी अथवा कागदपत्रे आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत ही जनावरे बेकायदेशीर कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलिस उपनिरीक्षक राम बारहाते, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक राजेश दवंगे तसेच पोलिस अंमलदार नागलोत, शिंदे, घुसिंगे, गायकवाड, मसलकर, कांबळे, वक्ते आणि आरखडे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT