Today, on the occasion of Shri Ram Navami, 42 processions are being held under tight police security
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात गुरुवारी (दि.२६) श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यानिमित्त शहरात ४२ भव्य, मिरवणुका आणि शोभायात्रा निघणार असून, दोन वाहन रॅलींचेही आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात एकूण १४ श्रीराम मंदिरे असून, किराडपुरा येथील श्रीराम मंदिर हे मुख्य केंद्र असणार आहे.
गुरुवारी दुपारी १२ वाजता येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडेल. याप्रसंगी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या उपस्थितीत महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १५०० हजार पोलिस तैनात ४ पोलिस उपायुक्त, ७ सहाय्यक पोलिस आयुक्त, ३१ पोलिस निरीक्षक, ६२ एपीआय./पीएसआय, ९५८ अंमलदार, १०१ महिला अंमलदार, १ एसआरपीएफ कंपनी, २ दंगा काबू पथक आणि ५०० होमगार्ड तैनात असतील.
सोबत ५ ड्रोन कॅमेरे आणि १७ व्हिडिओ ग्राफर नियुक्त करण्यात आले आहेत. संवेदनशील भागांत विशेष लक्ष तीन वर्षांपूर्वी श्रीराम नवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा येथे दंगल उसळी होती. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते.
यंदाही किराडपुरा श्रीराम मंदिर, आझाद चौक आणि रोशनगेट या संवेदनशील भागांत एसआरपीएफच्या सशस्त्र तुकड्या आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा रात्रीपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रमुख मंदिरे आणि कार्यक्रम किराडपुरा व्यतिरिक्त उस्मानपुरा, कुंभारवाडा, पद्मपुरा, लेबर कॉलनी, उल्कानगरी, बीड बायपास, रामनगर आणि चिकलठाणा अशा विविध भागांतील श्रीराम मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी प्रतिमा पूजन, भजन, कीर्तन आणि भंडारा असे कार्यक्रम पार पडतील. गतवर्षी शहरात ३३ मिरवणुका निघाल्या होत्या, त्या तुलनेत यंदा मिरवणुकांची संख्या वाढली आहे